

जालना (स्नेहा जावळे) । काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या पडत्या काळात मी काँग्रेससोबत राहिलो. संकटाच्या काळात मातब्बर नेते दुसर्या पक्षात गेले. तेव्हांही मी जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवली. राज्यमंत्री अर्जुन खोतकरांचा विक्रमी मतांनी पराभव केला. आणि तिसर्यांदा विधासभेवर निवडून आलो. मात्र तरीही पक्षानं माझा विचार केला नसल्याचं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय. आता कार्यकर्ते जे निर्णय घेतील ते मला मान्य असल्याचं म्हणत कैलास गोरंट्याल यांनी आपण नाराज असल्याचं स्पष्ट म्हटलंय.
दरम्यान, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्ता नाराज असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खातेवाटपाअगोदरच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार आता आपल्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे शिवसेना नेते अनिल देसाई यांच्याकडे अब्दुल सत्तारांनी राजीनामा सोपवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र देसाईंनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. देसाई म्हणाले अब्दुल सत्तारांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही. तसे पत्रही माझ्याकडे आलेले नाही. यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. आता स्वतः अब्दुल सत्ता माध्यमांना सामोरे जातात का आणि या नाट्यावर स्पष्टीकरण देतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.