वसई,दि. 21 (वार्ताहर) ः पालघर लोकसभा मतदार संघातील मतदानाला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बहुजन विकास आघाडीला विविध सामाजिक संघटना, संस्था यांचा जोरदार समर्थन मिळत आहे. शिट्टी गोठवून पक्षाला रिक्षा चिन्ह मिळाल्यामुळे प्रचारात अडचण निर्माण व्हावी असा विरोधकांचा गोड समज होता. मात्र तो पूर्णपणे फोल ठरला आहे. तालुक्यातील विकासकामाच्या बळावर स्थानिक नेतृत्व आ. हितेंद्र ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. रिक्षा चिन्हा मिळाल्याने रिक्षाचालकांना आता चांगले दिवस येतील व रिक्षा चालकांच्या अस्तित्वाची जाणीव सर्वच पक्षांना झाली आहे. आपल्या अडीअडचणीला कामाला येणारे स्थानिक नेतृत्व म्हणजे आमदार हितेंद्र ठाकूर असे अनेक रिक्षा संघटनांच्या पदाधिकार्‍यांचं मत ठरले. त्यामुळे बविआचे आ.हितेंद्र ठाकूर यांनी महाआघाडीद्वारे लोकसभा निवडणुकीत उभे केलेले उमेदवार बळीराम जाधव यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे ठरले. आज विरार येथील पक्षाच्या कार्यालयात रिक्षा संघटनेचे पदाधिकारी रघुनाथ काळभाटे व विजय खेतले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक संघटनांचे पदाधिकारी यांनी आ.हितेंद्र ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना जाहीर पाठिंबा दिला. या निवडणुकीत तालुक्यातील अनेक रिक्षा संघटना आपल्या पाठिशी असल्याचं सर्वच रिक्षा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. सध्या अडचणीचं ठरणारं सीएनजी रिफील सेंटर सहा महिन्यात पूर्णत्वास येईल व रिक्षाचालकांना मिरा-भाईंदर व ठाणे येथे जाण्याची गरज भासणार नाही असे आ.हितेंद्र ठाकूर यांनी रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. यावेळी प्रथम महापौर राजीव पाटील व महापौर रुपेश जाधव उपस्थित होते. रिक्षाचालकांच्या विविध समस्यांसाठी मी खंबीरपणे तुमच्या पाठिशी उभा आहे असे लोकनेते आ. हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी आश्‍वासन दिले. यावेळी रघुनाथ काळभाटे, विजय खेतले, जयकर तिवारी, दिनेश सिंग, शरद जळगांवकर, दयाशंकर गौंड, खालीद शेख, एकनाथ पाटील, सुधाकर इंगळे, नरेंद्र मेश्राम, सोहनलाल यादव, गोवर्धन प्रजापती, किशोर वैती, राजू वैती, नरेंद्र कौर, शरद सुळे, दादू धडस इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *