

वसई(प्रतिनिधी)-मनसेने पालघर मतदार संघात
बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे आता बविआ च्या रिक्षाला मनसे च्या इंजिनाची जोड मिळणार आहे.यावेळी बविआ आपल्या हक्काच्या शिट्टी निशाणी ऐवजी रिक्षा चिन्हांवर निवडणूक लढवत आहे.याठिकाणी बविआ व युती मध्ये थेट लढत होत आहे.त्यातच यावेळी मनसेने आपला उमेदवार कुठेही उभा केलेला नाही मात्र, मोदी, शहा मुक्त भारत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत आणि ते कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत आहेत. पण पालघर मतदार संघात कुणाला साथ द्यायची यावरून मनसेत संभ्रम होता.अखेर यावर तोडगा निघाला असून उद्या पासून मनसे पदाधिकारी बविआचा प्रचार करणार असल्याचे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे. मनसे च्या पाठींब्यामुळे बविआ चे बळ वाढणार आहे.
राजगडावर पालघरमधील कार्यकर्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब झालं. ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याबरोबर बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन चर्चा करत बविआ ला पाठिंबा दर्शवला.राज ठाकरेंच्या आदेशाने जाधव यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.यावेळी कुंदन संखे,जयेंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील,प्रवीण भोईर,विजय मांडवकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.पालघरची जागा महाआघाडीने बहुजन विकास आघाडी ला सोडली आहे. बविआ कडून माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर युती तर्फे विद्यमान खासदार राजेंद्र गावित रिंगणात आहेत.