

चिपळून ,प्रतिनिधी : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे माजी अध्यक्ष डि.जी .पवार यांचे सुपुत्र जनार्दन धोंडीराम तथा भाई जे. डी . पवार यांचे वयाच्या 71 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले . त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .
भाई जनार्दन धोंडीराम तथा जेडी पवार हे आंबेडकरी चळवळीतील एक जेष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. कालुस्ते बौद्धजन ग्राम विकास मंडळ मुंबई चे ते संस्थापक – अध्यक्ष होते . तसेच कालुस्ते पंचक्रोशी ग्राम विकास मंडळ मुंबई संचलित नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेचे संस्थापक सरचिटणीस होते . नालासोपारा बौद्ध समाज सेवा संघ , वसई-विरार समन्वय समिती या संस्थांमध्ये ते कार्यरत होते . रिझर्व बँक ऑफ इंडिया या बँकेत त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली होती. याखेरीज सामाजिक ,शैक्षणिक ,धार्मिक , क्षेत्रात त्यांचे काम वाखाणण्याजोगे होते . बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 2 मुंबई या शाखेचे ते सल्लागार म्हणूनही काम पाहत होते . एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा चळवळीत नावलौकिक होता . मुंबई व ग्रामीण स्तरावर त्यांचा मोठा लोकसंपर्क होता त्यांच्या अचानक निघून जाण्याने चळवळीला धक्का बसला आहे.
त्यांच्या अंत्यविधीला माजी महापौर रुपेश जाधव, माजी नगरसेवक विजय करंगुटकर , मामा वालीजकर ,दत्तात्रय धुळे ,अजित खांबे, विजय के पवार , प्राध्यापक विजय मोहिते ,डॉक्टर संजय खैरे ,डॉक्टर संदेश वाघ, प्राचार्य सीमा घोलप ,प्राचार्य सरिता अल्मेडा तसेच सामाजिक शैक्षणिक राजकीय व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.