

पालघर लोकसभा मतदार संघामध्ये महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार बळीराम जाधव यांना रिक्षा चिन्ह मिळाल्यानंतर सदरचे चिन्ह एका तासात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले. रिक्षा चिन्ह सर्वदूर पोहचू लागल्यामुळे शिट्टी चिन्ह गोठून मिळालेला आनंद सेना-भाजपला जास्त काळ टिकवता आला नाही. गल्ली बोळात ते बंगल्यापर्यंत व झोपडीपासून ते महालापर्यंत सर्वदूर रिक्षा जात असल्यामुळे बहुजन विकास आघाडीचा प्रचार आपोआप पसरला आहे.मात्र सेना-भाजप युतीने रिक्षा चिन्हाची प्रचंड धास्ती घेतली असून मतदानाच्या दिवशी रिक्षा बंद करण्याची मागणी भाजपाच्या युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार शुक्ला यांनी पालघर मतदारसंघाचा निवडणूक अधिकार्यांना पत्र पाठवून केली आहे. याबाबत ऑटो रिक्षा टॅक्सी-चालक मालक महासंघाचे सरचिटणीस रघुनाथ कळभाटे यांनी तीव्र निषेध केला असून रिक्षा हे आमच्या रोजी रोटीचे साधनआहे. आम्ही 29 तारखेलाच कशाला तर उद्यापासूनच रिक्षा बंद करतो असा गंभीर इशारा दिला आहे. तर त्याचबरोबर असे अनेक चिन्ह आहेत की ज्यामुळे ते निवडणूक केंद्रापर्यंत जातात व त्यामुळे आचारसंहितेचा भंग होतो अशा चिन्हांवर देखील प्रतिबंद केला पाहिजे असंही त्यांनी पुढे म्हटले आहे.भाजपाचे युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार शुक्ला यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, रिक्षामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होतो व याचा फायदा संबंधित उमेदवाराला होतो. त्यामुळे मतदान केंद्रापासून रिक्षाला लांब ठेवावे अथवा त्या दिवशी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील रिक्षा बंद ठेवाव्यात जेणेकरुन आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही. तसेच त्याच दिवशी रिक्षा चालू ठेवल्यास आचारसंहितेचा भंग होईल अशी भिती त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.तर दुसरीकडे या मागणीमुळे पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालक संतप्त झाले असून सेना-भाजप विरुध्द तीव्र रोष व्यक्त करीत आहेत. रिक्षा हे रिक्षाचालकांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. त्यामुळे ते बंदकरुन आमच्या पोटावर पाय आणायचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांना मतदानाद्वारे आम्ही उत्तर देऊ अशा संतप्त प्रतिक्रीया रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या आहेत.नाहक त्रास दिलात तर उद्यापासून ते मतदानापर्यंत रिक्षा बंद ठेवू ः रघुनाथ काळभाटेयासंदर्भात ऑटो रिक्षा चालक मालक महासंघाचे सरचिटणीस रघुनाथ काळभाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या मागणीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकांना नाहक त्रास दिल्यास 29 तारखेलाच कशाला आम्ही उद्यापासून रिक्षा बंद करु असा इशारा त्यांनी दिला आहे व त्याचबरोबर या गोष्टीचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सर्व रिक्षा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च काढून निवडणूक निर्णय अधिकार्यांचे लक्ष वेधून घेऊ असा इशारा दिला आहे.