

दि. १५/०२/२०२० रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात अत्यंत महत्वाच्या “अभिरूप न्यायालय” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत व्दितीय वर्ष व तृतीय वर्ष विधी शाखेच्या १०० विद्यार्ध्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे आयोजन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी विश्वस्त आणि विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त संकल्पनेतून करण्यात आले होते.
सदर स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मुंबई उच्च न्यायालय तसेच वसई कोर्टातील नामवंत विधीज्ञ उपस्थित होते.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पायल चोलेरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोफेसर राधा मित्रा,प्रो.दिशा तिवारी,प्रो.उत्कर्षा जुन्नरकर,,प्रो.विनोद गुप्ता,प्रो.प्रियांका तांडेल व विधी महाविद्यालय कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने पार पडले.
स्पर्धेदरम्यान खऱ्याखुऱ्या न्यायालयाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
न्यायालयातील प्रत्यक्ष कामकाज आणि कार्यपद्धतीस अनुसरून स्पर्धेचे कामकाज चालले.
न्यायालयाच्या कामकाजाचा ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ विधीज्ञ दिंगबर देसाई,प्रवक्ते वसई अॅडव्होकेट असो. तसेच वसई अॅडव्होकेट असो. च्या अध्यक्षा व ज्येष्ठ विधीज्ञ दर्शना त्रिपाठी, मुंबई उच्च न्यायालयात गेली १८ वर्षे वकिली करणारे योगेश रावल त्याच प्रमाणे १५ वर्षेपेक्षा जास्त अनुभवी विधीज्ञ जसबीर जोशीसारख्या ज्येष्ठ मंडळींच्या अधिपत्याखाली स्पर्धेचे परीक्षण झाले.
भारतीय राज्यघटनेतील मुलभूत अधिकार (अनुच्छेद १४,१५(१),२१) आणि हिंदू विवाह कायदा १९५५ यातील कलम ९.
परस्पर विरोधी मतांवर उभयपक्षांनी युक्तिवाद केला.
युक्तीवाद प्रस्थापित करण्यासाठी विविध न्यायालयांच्या निकालाचे दाखले, इंडियन लाॅ कमिशन चे रिपोर्ट, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मत, जनहित याचिका तसेच राज्य घटनेतील तरतुदीनुसार अनुच्छेद १४२ चा प्रभावी वापर इत्यादी सारखे प्रभावी दाखले वापरण्यात आले.
तब्बल ५ तास चाललेल्या स्पर्धेचे विजेतेपद हे तृतीय वर्ष विधी शाखेच्या हिमाली भोज, प्रशंसा दळवी व सिमरन सस्तोरी पटकावले तर उपविजेतेपद हे व्दितीय वर्ष विधी शाखेच्या स्वाती पाराडकर,अमित जोशी,तन्मयी वालावलकर यांनी मिळवले.
तृतीय क्रमांकाचे मानकरी धिरज पाटील, धनेश संखे,नलिन बारी हे ठरले.
उत्तेजनार्थ पारितोषिक टेरेन्स कोरिया,शारॅन परेरा व आरती शेट्टी यांना देण्यात आले.
तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन आणि विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हि स्पर्धा यशस्वी पार पडली.
महाविद्यालयातर्फे उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
पालघर जिल्ह्यात विधी साक्षरतेच्या ध्यासासाठी उदयास आलेले सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय नेहमीच वेगवेगळे सामाजिक आणि विधी साक्षरता उपक्रमांचे आयोजन करीत आलेले आहे आणि यापुढेही करीत राहील असे
सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्हाला पालघर सारख्या ग्रामीण भागात उत्तम दर्जाचे विधी शिक्षण उपलब्ध करून दिले तसेच वेळोवेळी विविध उपक्रम राबवून आमच्या यशस्वी वाटचालीत हातभार लावणारे अॅ.जे.डी तिवारी यांच्या प्रती विद्यार्थ्यांनी आपले विशेष आभार प्रकट केले.