प्रतिनिधी
विरार : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शेकडो विक्रेते बेकायदा बोकड, कोंबड्यांचे मांस विक्री करत असल्याचे पडसाद विधिमंडळात उमटले असले तरी महापालिका प्रशासनाचे मात्र अद्याप डोळे उघडलेले नाहीत. महापालिका प्रशासनाकडूनच डोळेझाक करण्यात येत असल्यानेच पालिका हद्दीत आजही उघड्यावर बोकड कापून मांस विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

विरार-मनवेलपाडा तलाव परिसरातील विक्रेते दिवसाढवळ्या मांस विक्रीची नियमावली मोडीत काढून मांस विक्री करत आहेत वसई मध्येदेखील वर्षं वर्षे मांस विक्री चालली आहे. एक वर्षापूर्वी पीएमसी बँकशेजारील एका मांस विक्रेत्याने दुकानातून निघणारे बोकडांचे रक्त थेट गटारात सोडल्याने हे रक्त तेथून जाणार्‍या जलवाहिनीत शिरून परिसरातील घराघरात गेले होते. त्या वेळी महापालिकेने त्याला केवळ पाच हजार रुपये दंड ठोठावला होता, मात्र त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे काही दिवसांतच पुन्हा दुकान सुरू केले होते. असेच प्रकार या भागात सुरू असतानाही महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, विधान परिषद सदस्य आनंद ठाकूर यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित करून या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. या प्रश्‍नाला लेखी उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात 615 बेकायदा मांस विक्रेते असल्याची माहिती दिली आहे.

या बेकायदा विक्रेत्यांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 382 व 386 अन्वये कारवाई करण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग आता कशी पावले उचलतो, याकडे वसई-विरारवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *