

नालासोपारा(प्रतिनिधी)-मतदानाचा पूर्वसंध्येला रविवारी मध्यरात्री नालासोपाऱ्यात शिवसेना व बविआमध्ये जोरदार बाचाबाची झाली.शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्यावर मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप बविआने केला आहे. गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून वसई-विरारचे महापौर रुपेश जाधव यांनी रविंद्र फाटक यांची गाडी थांबवली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी या गाडीची झडती घेतली असता यावेळी गाडीत दोन पाकिटांत ५०ते ६० हजार रुपये सापडले. याप्रकरणी महापौर रुपेश जाधव यांच्या फिर्यादीवरून फाटक यांच्यासमवेत जितेंद्र शिंदे, प्रवीण म्हापरलकर, हेमंत पवार, नवीन दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान शिवसेनेनेही महापौर रुपेश जाधव सह प्रशांत राऊत, उमेश नाईक,भरत मकवाना,भूपेंद्र पाटील, अतुल साळुंखे, निलेश देशमुख या ६ नागरसेवकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल केले आहेत.नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क येथे महापौर रुपेश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटत असल्याच्या संशयावरून आमदार फाटक यांच्या गाडीला गराडा घातला आणि गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शिवसेनेने आचारसंहिता भंग केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी केला आहे. तसंच आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका असा इशाराही बळीराम जाधव यांनी यावेळी दिला.तर दुसरीकडे आजवर दादागिरी व गुंडगिरी करून ,पैसे वाटून निवडून येत असलेल्या बहुजन विकास आघाडी चा पालघर लोकसभा निवडणुकीत पराभव होणार हे स्पष्ट झाले आहे. काल २८ एप्रिल रोजी शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक हे नालासोपारा येथे कार्यकर्त्याना भेटण्यासाठी आले असता विनाकारण तेथे बहुजन चे कार्यकर्ते जमले व त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू केला. आपल्या नेहमीच्या शैलीत बविआ कार्यकर्ते दबाव टाकत होते , त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी चोख उत्तर दिले. आपला पराभव समोर स्पष्ट दिसत असल्याने बहुजन विकास आघाडी घाबरली असून आता त्यांनी नाटकं सुरू केली आहेत. पालघर मध्ये शिवसेना भाजप महायुती चा विजय निश्चित असल्याने आता मतदानावर परिणाम व्हावा म्हणून बविआ कडून राडीचा डाव खेळला जात असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
ठाकुरांची गुंडागिरी वसई विरार च्या जनतेने पाहिली-रविंद्र फाटक

द्भव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईतील गुंडगिरी संपवण्यासाठी दिलेल्या आवाजाला जनतेचा चांगला प्रतिसाद भेटत आहे हे पाहून बविआ च्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच त्यांच्याकडून जमाव जमा करून हे दहशत निर्माण करण्याचे कृत्य केले जात आहे.गाडी फोडण्याची गुंडगिरीची भाषा महापौर करीत आहेत,त्यामुळे महापौरासकट त्यांच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांना केली आहे.ठाकुरांच्या या गुंडगिरीला यापुढे शिवसैनिक जश्यास तसे उत्तर देतील अशी प्रतिक्रिया आमदार रविंद्र फाटक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.