

विरार मनवेल पाडा येथे गर्दीच गर्द
विरार : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे गांभीर्य विरारमधील नागरिकांत प्रचंड कमी झालेले आहे. अत्यावश्यक चीजवस्तू घेण्याच्या नावाखाली सगळेच रस्त्यावर गर्दी करत असल्याने सरकारने लागू केलेल्या ‘संचार बंदी’ आदेशांचे धिंदवडे निघाले आहेत. बेजबाबदार आणि निष्काळजी लोकांच्या स्वैर वागण्यामुळे अन्य नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
संचार बंदी काळात नागरिकांची ग़ैरसोय होऊ नये म्हणून सरकारने अत्यावश्यक सेवांकरता वेळ ठरवून दिली आहे. मात्र काही ठिकाणी या अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली सगळेच दुकानदार दुकाने उघडून ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दुकानदार बंद शटरआड़ अव्वाच्या सव्वा दराने माल विक्री करत आहेत. पुढील काही दिवस वस्तूचा तुटवडा भासेल, या भीतीने नागरिक रस्त्यावर गर्दी करत असले तरी विक्रेते कोणतीही सामाजिक सुरक्षा अथवा काळजी घेत नसल्याने सर्वांचाच जीव धोक्यात आलेला आहे.
*गॅस सिलिंडरसाठी रांगा!*
कोरोनाच्यां पार्श्वभूमीवर सुरक्षा म्हणून गॅस सिलिंडर घरपोच मिळत नसला तरी विरार पूर्व- मनवेल पाड़ा (ओम गार्डन) तलावाजवळ मोठमोठ्या रांगा लावून नागरिकांना गॅस सिलिंडर मिळवावा लागत आहे. गॅस सिलिंडर घेण्यासाठी येणारांकडून काळजी घेतली जात नसल्याने येथेही सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे.
*दरम्यान; गॅस एजन्सीने योग्य ती खबरदारी आणि नियोजन करून गॅस वितरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.*
*कारगिल नगरमध्ये घराघरात दुकान!*
कारगिल नगरमध्ये फेरिवाल्यांची संख्या जास्त असल्याने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ही सगळी दुकाने उघड़ी ठेवली जातात. परिणामी लोक गर्दी करून सुरक्षा नियम धूड़कावत असल्याने दुकानदारांवर करवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.