

वसई : कैलास रांगणेकर
वसई तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यासहित वसई विरार शहर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. यात प्रमुख अडचण जागेची कमतरता असल्याचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आपल्या विष्णु वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टची मालमत्ता रुग्णांवरील उपचारासाठी विनामोबदला देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. तसे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना दिले आहे.
सध्या कोरोना विषाणूचा फैलाव वसई विरारमध्ये वाढू लागला आहे. त्यादृष्टीने जिल्हा व महापालिका प्रशासन वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदी करीत आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणेला जागेची अडचण भेडसावू लागली आहे. याकामी विष्णु वामन ठाकूर चॅरिटेबल, विरार संचालित विवा कॉलेज, विरार (दोन इमारती व जागा), शिरगाव येथील कॉलेजच्या इमारती व जागा या मालमत्ता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यास उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे. सध्या आवश्यक असणारे आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी, वैद्यकीय अधिकारी, नर्स, वार्ड बॉय तसेच सफाई व अन्य काम करणारे कर्मचारी यांच्या निवासासाठी लागणारी जागा, आय सी यू सेंटर उभारण्यासाठी या जागांचा जिल्हा व महापालिका प्रशासन उपयोग करू शकते. तथा महापालिका व महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासासाठी या जागेचा उपयोग करू शकता असे आवाहन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.