


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने आरोग्य आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात महापालिका आणि सत्ताधारी पक्षाला प्रश्न केलेला नाही. सगळे राजकारण रेशनवर येऊन थांबले आहे.
हे राजकारण आरोग्य आणि महापालिकेच्या या विभागातील भ्रष्टाचारापर्यंत येऊ नये; त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत म्हणून सत्ताधारी पक्षानेही सर्वांना मोफत रेशन देण्याच्या नावावर गुंतवून मूळ मुद्द्यापासून बाजूला ठेवले असल्याचे काही राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
असे असले तरी महापालिका आणि सत्ताधारी पक्षाचे बिंग वेळोवेळी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्र यातून फुटले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या सफाई कामगारांचेच आरोग्य धोक्यात असल्याची छायाचित्र प्रसिद्ध झाली होती. या कर्मचाऱ्यांबाबत महापालिका अथवा सत्ताधारी पक्षाने एक शब्दही काढला नव्हता. काही कामगारांनी तर अन्य एका राजकीय पक्षाला मास्क देण्याची विनंती केली होती, अशी माहिती आहे.
असाच प्रकार सॅंनिटायझिंगबाबत आहे. सॅंनिटायझिंग नेमके कुठे आणि कशाप्रकारे केले जात आहे, याबाबत नागरिक साशंक आहेत. सुरुवातीला तर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी स्वत:च्या कार्यालयात बोलावून जंतुनाशक औषध दिले होते. मात्र हे जंतुनाशक कसे आणि कुठे वापरावे, याबाबत काही नागरिकांना काहीच माहिती नसल्याचे कळते.
दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते राहत असलेले परिसर व्यवस्थित सॅंनिटायज केले जात असल्याचे चित्र समाज माध्यमांवर होते. आणि हे सगळे कसे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते काळजीपूर्वक करून घेत होते, असे चित्रही ‘फेसबुक लाइव’मधून उभे केले जात होते.
तर वसई-विरार महापालिकेकडून मात्र काही नागरिकांना सॅंनिटायझिंग मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यास त्याच परिसरात करण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. काही नागरिकांनी आपल्या परिसरात सॅंनिटायझिंग करण्यात यावे, अशी विनंती केली असता अधिकाऱ्यांनी त्यांना अशी उत्तर दिली होती.
विशेष म्हणजे वसई-कोळीवाड़ा परिसरात सोमवारी पालिकेने सॅंनिटायझिंग केले; मात्र या छायाचित्राने दोन हजार कोटी रुपये बजेट असलेल्या महापालिकेची अक्षरशः इज्जत काढली आहे. एका हातगाड़ीवर दोन ड्रम आणि पाईप यांच्यामाध्यमातून महापालिका कर्मचारी सॅंनिटायझिंग (?) करताना दिसत आहेत. इतक्या मोठ्या महापालिकेकड़े अशा बिकट स्थितीत आवश्यक यंत्र नसावे, यापेक्षा वसई-विरार महापालिकेचे दुर्दैव काय ?
यावर उपाय म्हणून सत्ताधारी पक्षाने सॅंनिटायझिंगसाठी दोन मशीन आणले असल्याची बातमी काही पाकिटधारी पत्रकारांनी दिली. मात्र ही मशीन कशासाठी वापरली जातात आणि प्रत्यक्षात महापालिका कशाप्रकारे सॅंनिटायझिंग करत आहे, हे दाखवले नाही.
मुळात या मशीन बोरास्ते एग्रोचे ‘ग्रेप्स स्प्रेयर’ आणि ब्लोवर आहेत. म्हणजे द्राक्ष बागेवर औषध फवारणी करण्यासाठी त्याचा वापर करतात. मात्र कोणत्याच माध्यमाने याबाबत संपूर्ण माहिती दिली नाही. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे युवा आमदार यांच्या माध्यमातून सॅंनिटायझिंगसाठी दोन मशीन आल्या; अशी जाहिरात करून सत्ताधारी पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला; मात्र महापालिका काय करतेय, याबाबत साधा एक प्रश्नही केला नाही.

