

विरार, दि. 5 – मागील एक महिन्यापासून विरार-मनवेलपाडा भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे, मात्र ही जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ता खोदण्यात आला असून, कंत्राटदाराने आवश्यक ती काळजी न घेतल्याने कारगिलनगर भागात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक लागल्यानंतर वसई-विरार महापालिकेकडून विरार शहरात जलवाहिनी टाकण्याची कामे जोरात सुरू आहेत.विरार पूर्वेकडील कारगिलनगर भागातून मनवेलपाडा गावापर्यंतही जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या जलवाहिनीसाठी कारगिलनगरमधून जाणारा रस्ता खोदण्यात आला आहे. निवडणूक कालावधीत जलवाहिनी टाकण्याचे काम जोरात सुरू होते, मात्र आता हे काम संथ झाले आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आल्याने या भागात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, नागरिक आणि रस्त्याशेजारच्या दुकानदारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जलवाहिनी टाकण्याचे काम कधी पूर्ण होणार, याची कल्पनादेखील नागरिकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्ता कधी होणार, याबाबतही नागरिक अनभिज्ञ आहेत. मागील एक महिना हे काम सुरू असून, तेव्हापासून या भागातील नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. आधीच कडक उन्हाळा, पाण्याची टंचाई आणि त्यात मोठ्या प्रमाणात उडणारी धूळे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आधीच या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. त्यात रस्ता खोदण्यात आल्याने वाहतूक कोंडीलाही नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या काम कधी पूर्ण होणार, कामाचा कालावधी आणि काम करत असलेल्या कंत्राटदाराबाबत या प्रभागातील नगरसेवकांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनाही काही कल्पना नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांत हा रस्ता विविध कामांसाठी अनेक वेळा खोदण्यात आला असल्याने रस्त्याची प्रत्येक वेळी दुर्दशा झालेली पाहायला मिळत आहे.