

(प्रतिनिधी विभावरी देसाई )अख्या जगावर आलेल्या संकटा वर मात करायची म्हणून केलेल्या lockdown ने आज लेखणी उचलायला भाग पाडले. नुसत्या डोळ्यांनीही न दिसणारा इवलासा विषाणू जगातील 200 देशांना काही दिवसांसाठी का होईना पण सक्तीचा ब्रेक लावू शकतो हे याची देही याची डोळा तुमच्या सारखीच मी ही पाहत आहे… अनुभवत आहे….
अगदी चंद्रा पर्यंत मजल मारलेल्या ह्या मानवाला eka क्षुद्र विषाणू ने बंदिस्त केलंय स्वतःच्या च घरात…. अगदी चोवीस तास….
गेले तीन महिने जवळ जवळ अख्खं जग या विषाणू शी लढा देतंय. लहान मोठया प्रमाणात प्रत्येक देशाला त्याची झळ पोहीचतेय. अगदी अमेरिका, स्पेन, इटली या सारखी बलाढ्य राष्ट्रे सुद्धा भेदरलेल्या सशासारखी बिळात घुसून बसलीयत. कुठल्याच क्षेत्रातील कुरघोडी किंवा प्राप्त केलेलं यश हा विषाणू चालवूनच घेत नाही आहे. पण म्हणतात ना आपलं घर जळल्याशिवाय त्याची झळ पोचत नाही तसं झालं… वर्तमानपत्रातून किंवा बातम्यांमधून या “corona” रावां बद्दल वाचताना कोसोदुर असलेल्या या विषाणूच्या वणव्याची धग आपल्याला जाणवली च नाही पण जेव्हा एक दोन करत भारतामध्ये सुद्धा त्याने त्याची पालं टाकायला सुरुवात केली आणि शेवटी 21 दिवसांच्या lockdown ची झळ आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली तेव्हा मात्र त्याची भीषणता जाणवायला लागली आणि मग मात्र मन अगदी न उमगलेल्या देवाला वारंवार आळवणी करू लागलं.
अरेच्चा! पण देवालाही त्याने बंदिस्त केलंय की स्वतःच्या घरात… आजच्या परिस्थितीला कुठल्याच धर्माचा किंवा संस्थानाचा देव कसा बरं प्रसन्न होऊन आळा घालत नाही? का बरं कुणी नवसाला पावत नाही? शेकडो नव्हे तर लाखोंच्या घरात माणस दगावली जात आहेत. मग या लाखो माणसांपैकी कुणी तरी केलेल्या नवसाला हा पावत कसा नाही आहे???
की माणसांसारखाच याचाही दगडच झालाय…
होय! झालो आहोत आपण दगड किंवा होत आलो आहोत. आणि त्याचीचपरतफेड म्हणून की काय आपला बाप… हा किमयागार…. साऱ्या सृष्टी चा निर्माता चांगलाच धडा शिकवतोय आपल्याला..
प्रगती किंवा संशोधनाच्या नावाखाली त्याच्या शिलेदारांची केलेली कत्तल त्याला भेडसावत नसेल का? हावरट असणाऱ्या आपल्या स्वभावाला त्याच सौंदर्य ओरबाडून घेताना त्याच्यावर नसतील का उमटले ओरखडे? त्याने आखलेल्या सीमारेषांचे काँक्रीटीकरण करताना त्याचाच पाया आपण उखडून टाकतोय याचच भान आपण विसरलो….
आणि अशा भ्रमिष्ट झालेल्या आपल्यातल्या दानवी वृत्तीला त्याने त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी च पुन्हा एकदा आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय. नाहीतर 200 देशांमधील रथी महारथी असणाऱ्या एकाही डॉक्टर ला किंवा संशोधकाला अगदी शंभर दिवसांनंतर ही औषध सापडू नये म्हणजे कमालच म्हणायची की…..
स्वतःच अस्तित्व अगदी सूक्ष्मतम असताना देखील बळी घेऊन प्रेताचे खच पडेपर्यंत च न थांबता त्या प्रेतांची विल्हेवाट ही न करता यावी इतकं त्याने मानवाला हतबल केलंय. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या संख्येची आकडेमोड करण्यापलीकडे सध्या तरी आपण काहीच करू शकत नाही आहोत. स्वतःच साम्राज्य पसरवताना ह्या अनोळखी नवख्या विषाणू ने जगाच्या कानाकोपऱ्यात आपली घौडदौड चालू ठेवली आहे. आणि तेही अगदी पाहता पाहता. एखाद्या सम्राटलाही तोंडात बोटं घालायला लावण्याइतकी कुरघोडी आपल्या डोळ्यादेखत 21 व्या शतकांतील मनुष्याला मुकाट सहन करावी लागते आहे. आणि तो फक्त आणि फक्त हतबल आहे…..
विचार करण्याचा प्रयत्न करून पाहा या हतबलतेच कारण तरी नेमकं काय असू शकतं???
कदाचित माझ्या मनोगतामध्ये तुम्हाला नकारात्मक सूर जाणवण्याची शक्यता आहे. काहींनी तर टीकास्त्र अगोदरच काढलं ही असावं की परिस्थिती च भान न ठेवता ही बोचरी मतं का मांडतेय आत्ता वगैरे…. पण कसं आहे ना मुळात एक कलाकार असल्यामुळे मन जरा काकणभर जास्तच संवेदनशील आहे आणि आजूबाजूला असणारी सद्य परिस्थिती आतल्या आत कुठे तरी कल्लोळ करतेय म्हणून म्हटलं व्यक्त होता येत का ते पाहावं…. इतरांसाठी नाही… स्वतः साठीच… कारण फक्त आणि फक्त स्वतःसाठी आणि स्वतः पुरतेच जगतो की आपण.. जगत आलो आणि जगत राहणार… आणि मग या स्वार्थासाठी निसर्ग च काय तर कुणाचीही कत्तल करू आपण अगदी निहत्ते…
तेच तर करत आलो आपण. मग ते म्हाताऱ्या आईबापाला स्वतःच्या स्वप्नांचे इमले बांधताना रस्त्यावर सोडणं असू देत… नाहीतर भाऊबंदकी साठी एकमेकांच्या गळ्यावर तलवारी फिरवणे…. आरामदायी सुखमय जीवन जगण्यासाठी निर्जीव सुखामागे धावताना लेकरांच बालपण कुरतडणं असू देत नाहीतर क्षणिक शारीरिक सुखासाठी कुणा कुमारिकेला ओरबाडण असू देत…
स्वतःच अस्तित्व सिद्ध करताना आपण मात्र इतरांवर कधीतरी कुठंतरी मूकपणे बलात्कार करत असतो याची जाणीव आपल्याला शिवतही नसते..
आज विषाणू मुळे सक्तीच्या केलेल्या lockdown मुळे आपण आपल्याच घरात कैदी झालो. सुरक्षित ते साठी लादलेली बंधन आपल्याला नकोशी वाटायला लागली. पिझ्झा आणि बर्गर सारख्या जिभेच्या चोचलयांमुळे आपले हट्ट पुरवताना स्वतःलाच नाकेनऊ येणाऱ्या आपल्याला सात्त्विक आहार पचायला जड जाऊ लागलाय…
पण अगदी प्रामाणिक पणे स्वतःलाच विचारून पहा की या पूर्वी असं इतकं वैयक्तिक पणे आपल्याच कुटुंबाशी कधी भावनीक नातं जुळलं होत??? कधी खेळीमेळीने एकत्र सहकुटुंब जेवलो होतो???कधी बरं बायकोचं एखाद्या पदार्थाबद्दल “फक्कड जमलाय बरं बेत” … म्हणून कौतुक केलं होतं???कधी बरं आपल्याच जन्मदात्याच्या औषध पाण्याची काळजी इतकी आपुलकी न केली होती???
आज विषाणू मुळे का होईना पण या स्वर्गीय सुखांशी आपली पुन्हा भेट घालून दिलीय. खात्रीनं सांगते lockdown नंतर या क्षणांच सोनं तुम्ही सर्वांना वाटत सुटाल आणि आतुरतेने प्रत्येक रविवार ची वाट पाहत राहाल.. lockdown मधले क्षण परत परत जगण्यासाठी….
आत्ता हे सर्व झालं चार भिंती मधलं. त्या भिंती पलीकडच्या जगात सुद्धा थोडं फार असंच काहीसं चित्र दिसतंय. पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित सर्व आपापल्या जीवाचं रान करून corona शी झुंज देत आहेत. जेणेकरून देशातील नागरिक सुरक्षित राहावा. प्रतिष्ठित व्यक्ती सढळ हाताने आर्थिक मदत देत आहेत. जात, पात, धर्म यांची गाठोडी बांधून माणुसकीच्या नात्याने गरजवंता च्या मदतीला प्रत्येक जण धावून जात आहोत. अहोरात्र आपल्या कर्तव्य सेवेत दक्ष असणाऱ्या पोलिसांसाठी घराघरातून अल्पोपहार येतोय आणि social मीडिया वर स्वतःच्या या असल्या कृतज्ञातेच गुणांचं फोटो सकट कौतुक करून घेतलं जातंय. माणूसपण जपलं जातंय…. आनंदच आहे ह्या सगळ्या गोष्टींचा, किंवा चांगल्या गोष्टीचं कौतुक न करता यावं असे कोत्या मनोवृत्ती चे संस्कार ही झालेले नाही आहेत त्यामुळे अगदी अशा बिकट परिस्थितीतही माणुसकी जपली जातेय याचाच अभिमान वाटतोय. पण corona परिस्थिती वगळता स्वतःलाच विचारून बघा की आपण खरंच जपतो का आपलं हे “माणूसपण”.
कर्तव्य दक्ष पोलिस नेहमीच स्वतःची जबाबदारी पार पाडत असतात पण काही सेकंदाच सिग्नल मोडून त्यांचा डोळा चुकवत अडकलेली चाकं दामटवण्यात आपल्याला सार्थ अभिमान वाटतो. आणि इतक्या वरच न थांबता आपल्या ह्या बहादुरीचे किस्से मित्रांमध्ये सांगत सुटतो की “कसं चुकवला मी नाक्यावर???” तेव्हा कसा विचार मनात येत नाही की आज ऊन, वारा, पाउस झेलत, स्वतःचे संसार ताटकळत ठेवून हे बांधव आपलं कर्तव्य पार पाडत असतात अगदी 365 दिवस… आणि फक्त क्षणिक सेकंदसाठी आपण आपल्याच देशातील कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवतो.
तेव्हा कुठं जात हे “माणूसपण”?….
नेहमीच्या च रस्त्याने जाता येता कोपऱ्यावरचा गटार
जवळचा भिकारी अगदी आत्ताच कसा नजरेला पडतोय आपल्या??? आठवून पहा1किती वेळा कानाडोळा करून किंवा त्याला हटकताना कुठं जातं आपलं हे “माणूसपण”?…
दोन वेळच्या ताटातले घासावर आडवा हात मारताना आपल्याला का या गोष्टीची जाणीव होत नाही की ज्याच्या मुळे हे घास पदरात पडता हेत तो ‘भूमिपुत्र’ मात्र कोरड्या भाकरी च्या शोधात गळ्याला फास लावतो आहे. हा विचार शिवला नुसता तरी पोटातली भूक ही मरून जावी इतकी भीषणता आहे त्यात…. पण आपण मात्र आपलं कातडं निब्बर करून घेतो आणि पुढ्यातलं आजचं वर्तमानपत्र उद्याच्या रद्दी भावासाठी बाजूला ठेवतो. कारण वर्षानुवर्षे या शिळ्या झालेल्या बातमी ना आपल्या लेखी काहीही किम्मत नाही. फक्त मित्रांबरोबर चहाच्या घोटांचा आस्वाद घेताना काही क्षण हे मुद्दे चघळणे एवढंच आपल्याला माहिती झालंय. अशावेळी वाटतं की खरंच मनुष्य प्राणी हा स्वार्थी असतो..”आपण मजेत आहोत ना… ” मग या पुढे तो दुसरं कशाचाच काही वाटून घेत नाही……
लहानपणी कुठेतरी वाचलं होतं, शाळेत शिकताना, पापाचा घडा भरला न की फुटतो??? त्याचा प्रत्यय याच जन्मी येईल याची मात्र खरंच अपेक्षा केली नव्हती.. कारण सद्य परिस्थिती ही कदाचित त्याचीच प्रचिती आहे की काय?? अशी शंका वाटू लागली आहे… शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा हा विषाणू मनुष्याला असा काही डसला आहे की या पूर्वी कधीही अशी हतबलता अनुभवली नव्हती…
पण म्हणतात ना की प्रत्येक काळरात्री ला एक सोनेरी पहाट असते, उगवणारा सूर्य आशेचा नवीन किरण घेऊन येईल आणि संपूर्ण श्रुष्टी निर्माण करणाऱ्या त्या किमयागराला मानवाची दया येऊन तो ह्या विषाणू च संकट नष्ट करेल अगदी कायमच…
आणि या त्याच्या कृपा दृष्टी साठी आपण मात्र त्याला नतमस्तक होणं तितकंच गरजेचं आहे. त्याने निर्माण केलेल्या श्रुष्टी ची कदर करून तिला जपणं हेच “माणूसपण” आहे आणि ते आपण नेहमीच1जपत ही राहिलं पाहिजे…
उद्याच्या आशेवर भरोसा ठेवून सध्याच्या lockdown च्या lockup मधून माझं धडधडत हृदय एकच आरोळी मारतय…
“गो corona गो”…….