

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जावेत, यासाठी वसई-विरार महापालिकेने चिमाजी आप्पा मैदानात भाजी बाजार सुरू करून दिला होता. तर इतर ठिकाणी लागणारे भाजी बाजार बंद करण्याचे आदेश दिले होते; मात्र त्यानंतरही वसई-कोळीवाडा येथे भाजी बाजार सुरू असल्याचे निदर्शनास आले असून; या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने हा बाजार बंद करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग-113 मध्ये हा बाजार भरत असून; याकड़े स्थानिक नगरसेवकही लक्ष देत नसल्याच्या तक्रारी आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन; वसई-विरार महापालिकेने हा बाजार बंद करण्याचे आदेश दिले होते. याऐवजी चिमाजी आप्पा मैदानात भाजी बाजार भरवला जात आहे. मात्र पालिकेचे आदेश धुडकावून वसई-कोळीवाड़ा येथील बाजार भरत असल्याने व या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान; वसई-विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांच्याकड़े काही नागरिकांनी याबाबत तक्रार करून; हा बाजार बंद करण्याची विनंती केली होती; मात्र त्यांनी नागरिकांच्या मागणीकड़े दुर्लक्ष केले आहे. तर वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड़े यांनी आपण याबाबत माहिती घेऊन योग्य ते निर्देश देतो, असे आश्वासन दिले आहे.