मित्रांनो…. संपूर्ण जग लॉकडाउनमध्ये पडले आहे. जगातील सगळी माणसे घरात आहेत. जगातले सगळे व्यवहार थांबले आहेत.

जो तो आपल्या परीने काळजी घेतोय आपली आणि आपल्या माणसांची. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून.

पण या सगळ्यात हुशार आणि शहाणी (अतिच) आहेत; ती वसईमधील हाथीमोहल्ल्ला, कोळीवाडा, पाचुबंदर येथील माणसे. यांचा संचार बंदीतील स्वैराचार बघा. यांना कोरोना होणार नाही; याबाबत प्रचंड आत्मविश्वास वाटतोय, असेच वाटेल.

सरकार, पोलीस, पालिका प्रशासन, नगरसेवक, समाजसेवक, प्रसारमाध्यमे असे सगळे यांना ‘घरात बसा; सुरक्षित रहा’ असे सांगून दमलेत. पण यांनी संपूर्ण जगाला मूर्ख ठरवले आहेच; पण या सगळ्यांनाही मूर्ख ठरवून वसईवाल्यांनी आपले शहाणपण (?) सिद्ध केले आहे.

ही माणसे घरात बसायला तयार नाहीत. त्यांना निकड आहे ती भाजीपाल्याची. रोज रोज येऊन ही माणसे ती नेतायत. अगदी कुटुंबासहीत येऊन. काही तर चिकन आणि माशांच्या शोधात असतात. बरे ती येतात तेव्हा; त्यांना आवश्यक ती काळजीही घ्यावीशी वाटत नाही. हे नियमबियम यांच्यासाठी नाहीतच मुळी. असा वावर असतो या सगळ्यांचा बाजारातला.

अहो…. वसई; नालासोपारा आणि विरार पश्चिममध्ये मागच्या दोन दिवसांत झपाट्याने कोरोना संशयित सापडत आहेत. खरे तर हा दाटीवाटी आणि प्रचंड राहदारीचा परिसर. इथे कोरोनाचा शिरकाव झाला तर? हा प्रश्न यांच्या मनाला शिवत नाही. हे लोक बाहेर फिरताहेतच. कोणत्या दैवी चमत्कारावर विश्वास ठेवून आहेत ही माणसे कोण जाणे?

मृत्यू उंबऱ्यावर उभा आहे; तरीही यांचा जीव बाजारात अडकलाय. कुणाच्या बापाचे ही माणसे एकत नाहीयेत…. कदाचित यांच्यात उपजत खेकड़ा वृत्ती म्हणतात ती असावी.

तरीही सांगावेसे वाटते…. मित्रांनो घरात बसा; आपला नाही तर नाही; आपल्या कुटुंबीयांचा तरी विचार करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *