

प्रतिनिधी
विरार : कोरोनाचा प्रसार रोखण्यात आणि शहरात स्वच्छ्ता ठेवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या वसई-विरार महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचे परतीचे मार्ग बंद झाल्याने या कर्मचाऱ्यांना वस्तीसाठी जिल्हा परिषद शाळेचा आधार घ्यावा लागला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांची झालेली ग़ैरसोय लक्षात घेऊन प्रभाग-28 च्या नगरसेविका हेमांगी पाटील यांनी या सफाई कर्मचाऱ्यांना जेवण आणि पाणी देण्यासोबत इतर दिवसांसाठी लागणारे रेशन देऊन दिलासा दिला आहे.
वसई-विरार महापालिकेचे बहुतांश सफाई कर्मचारी हे सफाळे, केळवे आणि पालघर भागातून येतात. मात्र वसई-विरार शहरात वाढत असलेला कोरोनाचा प्रसार पाहता; शहरात येणारी आणि शहराबाहेर जाणारी पालिकेची सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या सफाई कर्मचाऱ्यांना घरी परतणे शक्य झालेले नाही. परिणामी या सफाई कर्मचाऱ्यांसमोर वस्ती कुठे करायची, हा प्रश्न होता.
याबाबतची माहिती प्रभाग-28च्या नगरसेविका हेमांगी पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने यातील आठ सफाई कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय विरार-मनवेल पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत करून दिली. शिवाय त्यांना बुधवारी रात्रीचे भोजन पुरवतानाच; इतर दिवसांसाठी लागणारे रेशनही विकत घेऊन दिले.
दरम्यान; बुधवारी सकाळी शहरात औषध फवारणी करण्याचे आदेश असल्याने; यातील एका सफाई कर्मचाऱ्याने पहाटे पाच वाजता घर सोडले होते; मात्र वाहतूक सुविधा नसल्याने वेगवेगळे मार्ग अवलंबत या सफाई कर्मचाऱ्याने केळवे-सफाळे-मनोर असा प्रवास करत सकाळी 9 वाजता विरार गाठले होते.