


‘
प्रतिनिधी
विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, यासाठी वसई-विरार महापालिका शहरात सॅंनिटायझिंग करत असेल तर सॅंनिटायझिंग टैंकवर सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे चिन्ह का? असा सवाल वसई-विरार भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड़े यांना पत्राद्वारे केला आहे.
दुसरीकडे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी पक्षातर्फे सँनिटायझिंग केले जात असेल तर सत्ताधारी पक्ष यासाठी पालिका कर्मचारी कसे वापरू शकतो; असा जाबही मनोज पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना केला आहे.
या पत्रासोबत मनोज पाटील यांनी दोन फोटो जोडले आहेत. आणि त्याद्वारे राजकीय पक्षाच्या वतीने केल्या जाणाऱ्या फवारणीसाठी महापालिका कर्मचारी कसे वापरले जाऊ शकतात? आणि जर फवारणी महापालिका करत असेल तर राजकीय पक्षाचे चिन्ह वापरून प्रचार का सुरू आहे? असे प्रश्न मनोज पाटील यांनी केले आहेत.
हा प्रकार महापालिका प्रभाग क्र -५६ नाळे परिसरात सुरू असल्याकड़ेही त्यांनी लक्ष वेधले आहे. आणीबाणीच्या काळात सत्ताधारी पक्षाकडून पालिका यंत्रणेचा होत असलेला वापर पाहता संबंधितावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.