

प्रतिनिधी
विरार : लॉकडाउनला तब्बल एक महिना उलटून गेल्याने आता हातावर पोट असलेल्या नागरिकांना आर्थिक चणचण भेडसावू लागली आहे. याच चणचणीतून विरार-कारगिल नगरसारख्या गरीब वस्तीच्या भागात दररोज एटीएमसमोर रांगा लागताना दिसत आहेत.
लॉकडाउनमुळे कार्यालय आणि उद्योगव्यवसाय बंद आहेत. या काळात नागरिकांना आपला पगार तरी मिळेल की नाही; याबाबत शंका आहे. लॉकडाउनला आता एक महिन्याहून अधिक काळ झाला असून; गरीब-गरजू आणि मध्यम वर्गीय नागरिकांनाही आर्थिक चणचण भासू लागली आहे.
कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव, त्या अनुषंगाने वाढत जाणारा लॉकडाउन आणि दैनंदिन गरजा लक्षात घेऊन बचतीतून पैसे काढण्यासाठी नागरिक एटीएमसमोर रांग लावताना दिसत आहेत.
विरार-कारगिल नगर भागात अनेक जण छोटी-मोठी नोकरी करतात. अनेक जण जवळपासच्या औद्योगिक ठिकाणी काम करतात; याशिवाय हातावर पोट असलेल्या नागरिकांचीही संख्या जास्त आहे. त्यामुळे हे लोक सर्वाधिक आर्थिक चणचणीला तोंड देत आहेत.
