

नालासोपारा(प्रतिनिधी)- करोनासारख्या आपत्तीने देशभरात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. वसई विरार मध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
पालिका क्षेत्रात सध्या कोरोनाबाधीतांची संख्या १०० वर पोचली आहे. यामधील ८ जणांचा मृत्यूही झाला आहे.पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार मध्ये कोरोना चे एकूण ९ हॉटस्पॉट असून रुग्ण आढळलेल्या २० ठिकाणी सील केल आहे.एवढी भयानक स्थिती शहरात आहे.
मात्र वसई विरार प्रशासन हे रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाय करण्यास अपयशी ठरत आहे.विशेष म्हणजे सर. डी. एम. पेटीटनंतर पुन्हा एकदा नायगांव येथील बालसंगोपन केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली गेली नसल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे नायगांव येथील बालसंगोपन केंद्रात विनापरवानगी विलगीकरण कक्ष पालिकेने तयार केल्याची माहिती पुढे येत आहे. शिवाय या ठिकाणी प्रसूती कक्ष आणि कोरोना विलगीकरण कक्षात जाण्यासाठी एकच मार्ग ठेवल्याने वसई-विरार महापालिका कोरोनाबाबत किती गंभीर आहे हे दिसून आले आहे. या माता बाल संगोपन केंद्रातील ५ कर्मचारी करोना बाधीत झाले असून यामध्ये २ नर्स, २ वॉर्डबॉय १ आया यांचा समावेश असून व पालिकेच्या वसई डीएम पेटीट रुग्णालयातील ४ नर्स १ वॉर्डबॉय कोरोना बाधीत झाले आहेत.त्यामुळे पालिकेचे कर्मचारीदेखील भीतीच्या सावटाखाली असल्याचे पहावयास मिळत आहे. महापालिका प्रशासनाने सुरवातीपासून डॉक्टर व नर्स यांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही. त्यामुळे ११ रुग्णालयातील कर्मचारी हे कोरोना बाधीत झाले असल्याचा आरोप भाजप कोकण विकास आघाडीचे सरचिटणीस सचिन कदम यांनी केला आहे.वास्तविक वसई विरार पालिकेच्या आरोग्य यंत्रणेलाच कोरोना चे ग्रहण लागले असल्याचे सचिन कदम यांनी युवाशक्ती एक्सप्रेसकडे बोलताना सांगितले.
पालिका क्षेत्रात धोका पत्करून कामावर येणाऱ्या महापालिकेचे आणि इतर शासकीय कर्मचारी, डॉक्टर, परिचारीका, इतर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे होते.परंतु पालिका मूलभूत सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात आला आहे. परिणामी पालिका प्रशासनाच्या शून्य नियोजन कारभारामुळे कर्मचारी आपल्या जीव धोक्यात टाकून काम करत आहे.त्यामुळे पालिकेच्या कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणमुळे वसई विरार बनणार कोरोना ‘हॉटस्पॉट‘ –
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव घालण्यासाठी केंद्र व राज्य शासन तोडीस तोड प्रयत्न करताना दिसून येते. मात्र नेमके करोनाला रोखण्यासाठी वसई विरार शहर महापालिका तोंडावर उताणी पडलेली दिसून येते. सुरूवातीला स्थानिक वर्तमानपत्रांनी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वसई विरार शहर महापालिकेला पालिका हद्दीत औषध व धुर फवारणी करण्याचे शहाणपण सुचले होते. त्यानंतर करोनाग्रस्तांची संख्या १०० पार गेली
असताना आरोग्य यंत्रणेतील गोंधळ समोर आला आहे. दोन दवाखाने पालिका प्रशासनाच्या बेफीकीर कारभारामुळे अक्षरश: सील करावे लागले आहेत. त्यात सोशल डिस्टनशिंगचे धिंडवडे उडवणारे नागरिक पोलिसांची डोकेदुखी ठरू लागलेत. भाजीपाला मार्केट, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने याठिकाणी नागरिक सामान, भाजीपाला विकत घेण्यासाठी सर्वच शासकीय नियमांना हरताल फासून झुंबड उडवत आहेत. नागरिकांचा हा बेजबाबदारपणा इतका टोकाला गेलाय, की महापालिकेकडून त्याची साधी दखल घेतली जात नाहीय, हेच दुर्दैवं. महापालिकेला आधी आयुक्त नव्हते. त्यामुळे पालिकेच्या अधिकार्यांना नेमकी परिस्थिती कशी हाताळायची याचे शहाणपण अवगत नव्हते हे एकवेळ समजू शकते. मात्र आता नवे आयुक्त डी.गंगाथरन यांच्या रूपाने प्राप्त होऊनही पालिकेचा कारभार इतका धसमुसळा कसा? असा सवाल सुज्ञ नागरिक विचारू लागले आहेत. वसई विरार शहर महापालिकेच्या तुलनेत इतर महापालिका प्रशासनांचे नागरिकांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष आहे. नागरिकांनी बेजबाबदारपणाचे दर्शन घडवले की लगेच कठोर पावले उचलली जातात. मात्र नेमके वसई विरार शहर महापालिकेलाच हे का जमत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. सोशल डिस्टनशिंगचे पालन न करणार्या नागरिकांमुळेच पोलिसांच्या डोक्याभोवतीचा ताप वाढला आहे. आयुक्त डी. गंगाथरन व पालिकेच्या नऊही प्रभागांतील संबंधित प्रभारी साहाय्यक आयुक्तांचा हाच बेजबाबदारपणा कायम राहणार असेल तर वसई विरार शहर महापालिका परिसर कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट होण्यास वेळ लागणार नाही.
नालासोपार्यात सोशल डिस्टनशिंगचे धिंडवडे–
नालासोपारा पूर्वेतील तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलकापुरी परिसर तसेच सनशाईन परिसरातील नागरिक तर अक्षरश; बेजबाबदारपणे वागताना दिसून येतात. याठिकाणी संध्याकाळी नागरिक झुंडीच्या झुंडीने बाहेर पडून भाजीपाला तसेच इतर जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी भाहेर पडतात. या नागरिकांमध्ये करोना विषाणूला घेऊन कोणतेही गांभिर्य उरलेले नाही हे त्यांच्या बेफीकीर वागण्यावरून दिसून येते. अलकापुरी, सनशाईन परिसरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच करोनाचे रूग्ण आढळले आहेत. मात्र या दोन्ही परिसरातील नागरिकांची संख्या पाहता याठिकाणी विषाणूचा स्फोट झालाच काय स्थिती ओढवेल याची कल्पनाही न केलेली बरी. महापालिका आयुक्त डी.गंगाथरन यांना हा नागरिकांचा बेजबाबदारपणा दिसत नाही का? का या बेफीकीर नागरिकांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत नाहीत, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
पोलिसांच्या डोक्यालाच आणखी किती ताप ?–
सध्याच्या आपत्ती काळात नागरिकांनी कसे वागले पाहिजे, शासनाच्या तळमळीने होणार्या आवाहनाकडे किती काळजीने पाहिले पाहिजे याचे गांभिर्यच नागरिकांत उरलेले दिसत नाही. जे बेजबाबदार वागतात त्यांच्यावर म्हणूनच पोलीस कारवाई करतात. मात्र जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली निष्काळजीपणे सोशल डिस्टनशिंग धाब्यावर बसवून घराबाहेर झुंडीने उतरणारे नागरिक पोलीस आणखी किती काळ सोसणार आहेत. या नागरिकांना निर्बंध घालण्यासाठी महापालिका आयुक्तांनी जबाबदारीने पावले उचलली पाहीजेत, मात्र तेच उदासीन असल्याचे चित्र आहे. त्यांच्या उदासीन वागण्यामुळे पोलिसांच्या डोक्याभोवतीचा ताप वाढला आहे.
आधीच करोना विषाणूचा फैलाव जोमाने वाढत असताना वसई विरार शहर महापालिकेने डोळ्यांत तेल घालून खबरदारी घेणे गरेजेचे आहे. मिरा भाईंदर व मुंबई शहर महानगरपालिकेच्या तुलनेत वसई विरारमधील करोना विषाणूचा होत असलेला फैलाव अत्यंत धोकादायक आहे. अशावेळी सोशल डिस्टनशिंग यासह अन्य खबरदार्या घेतल्या जात आहेत की नाही यावर महापालिका प्रशासनातील अधिकार्यांचे खासकरून आयुक्तांचे व संबंधित प्रभारी सहआयुक्तांचे लक्ष असणे नितांत गरजेचे आहे. मात्र आयुक्तांच्या ढिसाळ कारभारामुळे परवाना नसलेले भाजीपाला विक्रेते ठिकठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यामुळे करोना विषाणूच फैलाव वाढला तर महापालिकेची आधीच चाचपडत असलेली आरेग्य यंत्रणा त्याविरोधात लढणार तरी कशी? याचे भान आयुक्त डी. गंगाथरन यांना असायला हवे.
-सचिन कदम(सरचिटणीस-भाजप कोकण विकास आघाडी)