वसई : करोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, संचारबंदी, जमावबंदी, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतानाही काही नागरिक या कायद्याचे उल्लंघन करताना दिसत आहेत. पालघर पोलीस दलानेदेखील कडक निर्बंध लादत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. असे असताना नागरिक मात्र अद्यापही गांभिर्य हरवून वागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. अशा परिस्थितित जिल्हाधिकार्‍यांनी आता आणखी कडक पावले उचलत नागरिकांना इशारा दिला आहे. त्यांनी नुकतेच पारित केलेल्या एका आदेशात यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न घालणे, भाजीपाला विक्रेते, किराना दुकानदार, फळ विक्रेते तसेच जिवनावश्यक ठिकाणी सामाजिक अंतराला तिळांजली देणारे नागरिक, तसेच किराना दुकानदार व जिवनावश्यक मालाचे पुरवठादारांनी त्यांच्या दुकानात निश्‍चित दरपत्रक न लावणे या सर्वांवर आता महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम-2020 चा नियम 10 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये पालघर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, चेहर्‍यावर मास्क लावणे. सामाजिक अंतर चे पालन करणे यांचे उल्लंघन करणार्‍यांवर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

अशी होईल कारवाई –
* सार्वजनिक स्थळी (रस्ते, बाजार, रूग्णालय, कार्यालय ई.) थुंकणे –
पहिल्यांदा थुंकल्यास 500 रूपये दंड, दुसर्‍यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई होणार
ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका, ग्रामपंचायत) तसेच संबंधित शासकीय विभाग प्रमुख (कार्यालय क्षेत्रांमध्ये)

* सार्वजनिक स्थळी चेहर्‍यावर मास्क न वापरणे –
पहिल्यांदा आढळल्यास 200 रूपये दंड, दुसर्‍यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई होणार
ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच संबंधित शासकीय विभाग प्रमुख (कार्यालय क्षेत्रामध्ये)

दुकानदार / फळभाजीपाला विक्रेते/ सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते इत्यादी आणि ग्राहक यांनी सोशल डिस्टनशिंग न राखणे (2 ग्राहकांमध्ये कमीत कमी 3 फुट अंतर न राखणे, विक्रेत्याने मार्किंग न करणे
पहिल्यांदा आढळल्यास 200 रूपये दंड (ग्राहक व व्यक्ती), रक्कम 2000 रूपये दंड (आस्थापना मालक/दुकानदार/ विक्रेता), दुसर्‍यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई,स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सदरची कारवाई करण्यात येईल.

* किराणा/जीवनावश्यक वस्तूंचे दरपत्रक न लावणे
पहिल्यांदा आढळल्यास रूपये 2000 दंड, दुसर्‍यांदा आढळल्यास फौजदारी कार्यवाही, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित शासकीय विभाग प्रमुख (कार्यालय क्षेत्रामध्ये) सदरची कारवाई करतील.
सदर आदेशांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल. तसेच कार्यवाही करणार्‍या अधिकारी/कर्मचारी यांनी वरील नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींचे आवश्यकतेनुसार फोटोग्राफी /व्हिडीओग्राफी (मोबाईल इत्यादीद्वारे) करावी व त्यानंतर संबंधिताविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51(ब), भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860ऊ च्या कलम 188 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 अंतर्गत संबंधितांवर दंडनिय/कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *