वसई : (प्रतिनिधी) : सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या पटीने वाढला आहे. या काळात राज्यातल्या तीन महापालिकांची निवडणूक घेणे शक्यच नाही. या महापालिकांमध्ये वसई विरार शहर महापालिका, औरंगाबाद महापालिका व नवी मुंबई महापालिका यांचा समावेश आहे. यात औरंगाबाद महापालिकेची मुदत आज मंगळवारी (दि.28 एप्रिल) संपली असून नवी मुंबई महापालिकेची मुदत 7 मे तर वसई विरार शहर महानगरपालिकेची मुदत 28 जूनला संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सदर महापालिकांना मुदतवाढ मिळेल का? या प्रश्‍नावर अखेर राज्य निवडणूक आयोगाने आपली भुमिका स्पष्ट करत राज्य शासनाला सदर तिन्ही महापालिकांवर प्रशासक नेमण्याचे पत्र राज्य शासनाला दिले आहे. राज्ष निवडणूक आयोगाच्या या शिफारशीनंतर वसई विरार शहर महानगरपालिकेसहित आरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमल्या जाण्याच्या प्रक्रियेला हालचाली सुरू होणार आहेत, असे समजते.
सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने या काळात राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणूका घेणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण देत राज्य शासनाने या तिन्ही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकळल्या आहेत. या काळात आधीच्या महापालिका प्रशासनातील सदस्यांना मुदतवाढ देण्यात येईल की कसे यावर आता राज्य निवडणूक आयोगाने मौन सोडत प्रशासक नेमण्याची विनंती राज्य शासनाला केली आहे. आरंगाबाद महापालिकेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी करण्यात आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ती नाकारली. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारच्या काळात पाच महापालिका निवडणुकांना आरक्षणाच्या मुद्द्यावर मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती. मात्र सदरप्रकरणी मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली होती. तसेच त्या पाचही महापालिकांवर प्रशासक नेमण्याचे आदेश शासनाला दिले होते. या निकालाचाच आधार घेत राज्य निवडणूक आयोगाने वसई विरार शहर महानगरपालिका, व अन्य दोन महापालिकांवर प्रशासक नेमण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *