प्रतिनिधी

वसई : वसई-कोळीवाडा येथील विनापरवाना ‘इनाया वॉटर प्लांट’मध्ये सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन; वसई-विरार महापालिकेने हा प्लांट बंद करण्याचे आदेश कय्युम शेख याला दिले होते.

मात्र आपल्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांनी तक्रार केल्याच्या संशयातून कय्यूम शेख यांनी पाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना तसनीफ़ नूर शेख यांच्या घरी पाठवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तसनीफ़ नूर शेख यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
…..

इनाया वॉटर प्लांटमध्ये सोशल डिस्टनसिंग आणि इतर नियम पाळले जात नसल्याने महापालिकेने हा प्लांट बंद केला आहे. याआधीही वसई-विरार महापालिकेने या प्लांटला कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र आपण तक्रार केली या संशयातून प्लांट मालक माझ्या घरी ग्राहकांना पाठवून आपला राग व्यक्त करत आहे. यामुळे माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षेला धोका आहे. याबाबत मी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड़े आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांना माहिती दिलेली आहे. लवकरच मी महापालिका आयुक्त ड़ी. गंगाथरन व वसई पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन याबाबत तक्रार करणार आहे.
– तसनीफ़ नूर शेख, सामाजिक कार्यकर्ता, वसई

……

वसई-कोळीवाड़ा येथील इनाया वॉटरमधून बेकायदा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. याशिवाय या वॉटर प्लांटमध्ये येणारे ग्राहक सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत नसल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड़े यांनी हा वॉटर प्लांट बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश झुगारुन हा वॉटर प्लांट मागील दरवाजाने सुरूच होता. याबाबतची माहिती वसई-विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा करवाई केली होती.

दरम्यान; सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांनी आपली तक्रार दिली या संशयातून ‘इनाया वॉटर प्लांट’चा मालक कय्यूम शेख संतप्त झाला असून; त्याने आता पाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना तसनीफ़ नूर शेख यांच्या घरी पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. ही बाब तसनीफ़ नूर शेख यांनी; अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड़े व प्रभारी सहायक आयुक्त सुभाष जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

…….
अशी झाली होती कारवाई!

‘कोरोना’ या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि वसई-विरार महानगर पालिका प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. मात्र याचा गैरफ़ायदा वसई-कोळीवाडा येथील इनाया वॉटर प्लांट घेत होता.

वसई-कोळीवाड़ा येथील नूरी मैदानाजवळ इनाया वॉटर सप्लायर्स नावाचा हा शुद्ध पाण्याचा प्लांट आहे. या प्लांटच्या परवानगी आणि शुद्ध पाण्याबाबत सुरुवातीपासूनच नागरिकांनी संशय व्यक्त केला होता. वसई-विरार महापालिकेनेही या प्लांटला परवानगी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शुद्ध पाण्याच्या नावाखाली या प्लांटमधून फसवणूक होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. 5 ते 10 रूपयांना असलेली बाटली 40 ते 50 रूपयांना विकली जात होती.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या प्लांटबाबत अनेक तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतरही पालिकेने कारवाईची पावले उचलली नव्हती. हा विषय मागील दोन दिवसांत प्रसारमाध्यमानी उचलून धरल्यानंतर वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड़े यांनी हा प्लांट बंद करण्याचे आदेश दिले होते; मात्र हे आदेश धुड़कावून शुक्रवारी हा प्लांट मागील दरवाजाने सुरूच होता, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली होती.

पोल्ट्री फार्मही बंद करा!

इनाया वॉटर प्लांटशेजारीच पोल्ट्री फार्म आहे. या फार्ममधून निघणारा कचरा आणि दुर्गंधी यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे हा पोल्ट्री फार्मही बंद करावा, अशी विनंती नागरिकांनी वसई-विरार महापालिकेला केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *