
अवघ्या आठवडाभरात पुन्हा हल्ला
मागील आठवड्यात संपादक आणि कामगार नेते अभिजीत राणे यांच्या निवासस्थाना समोर उभ्या त्यांच्या कार वरील हल्ल्याची चौकशी अद्याप चालू असतानाच काल रात्री थेट त्यांनाच लक्ष्य करून पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकाचे प्रसंगावधान आणि ड्रायव्हर सीट मध्ये असलेले अभिजीत राणे यांचे धैर्य आणि साहस यामुळे अखेरच्या क्षणी फसला.
मध्यरात्री अभिजीत राणे हे गोरेगावहून मालाडला जात असताना मीठ चौकात त्यांची कार यू टर्न घेण्यासाठी स्लो झाली असता तिथेच दबा धरून बसलेला एक इसम भलामोठा लोखंडी रॉड उगारून राणे यांच्या गाडीकडे धावत येऊ लागला. आडदांड देहयष्टीचा तो इसम हल्ल्याच्या इराद्याने येत आहे हे लक्षात येताच अभिजीत राणे यांच्या बाजूलाच बसलेले सुरक्षा रक्षक सकपाळ यांनी क्षणार्धात दार उघडून त्या हल्लेखोराला रोखण्यासाठी धाव घेतली. आपण पकडले गेलो तर आपल्याला “सुपारी” देणारे सूत्रधार उघड होतील हे लक्षात येताच गाडीच्या विंड शिल्ड वर आणि अभिजीत राणे यांच्यावर नेम धरून आघात करण्याच्या तयारीत असलेल्या हल्लेखोराने लोखंडी शीग तिथेच फेकली आणि तो पळत सुटला. सुरक्षा रक्षक सकपाळ आणि अभिजीत राणे यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
अभिजीत राणे यांनी मालाड मधील बांगूर पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ तक्रार दाखल केली.
अवघ्या आठवडाभरात लागोपाठ दुसऱ्यांदा हल्ल्याचा प्रयत्न होतो याचा अर्थ गुन्हेगारांची एखादी टोळी यामागे आहे हे स्पष्ट आहे. अभिजीत राणे हे दै. मुंबई मित्र आणि दै. वृत्त मित्र या मराठी हिंदी वृत्तपत्रांचे संपादक आहेत. शिवाय त्यांचे यू ट्यूब चॅनेल आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नेटवर्क मध्ये पन्नास लाख लोक संबंधित आहेत. शिवाय त्यांच्या दोन हजार कारखाने, हॉटेल, हॉस्पीटल आणि आस्थापनात युनियन आहेत ज्यांची सदस्य संख्या दहा लाखांच्या आसपास आहे.
वृत्तपत्र आणि युनियन या दोन्ही क्षेत्रात संघर्ष अटळ असतो. दोन्ही क्षेत्रात स्पर्धा, वैर, द्वेष, आघात, प्रतिघात होणे नवीन नाही.
अनेक पत्रकार आणि युनियन नेत्यांवर या आधीही जीवघेणे हल्ले झाले आहेत.
अभिजीत राणे यांची पत्रकारिता सत्यशोधक आणि गौप्यस्फोट शैलीची आहे. त्यामुळे अनेकांच्या हितसंबंधांची पोलखोल ते जीवावर उदार होऊन करीत असतात. यामुळे दुखावलेल्या समाज कंटकांचे कारस्थान या हल्ल्यांमागे असू शकते.
अभिजीत राणे यांच्या ‘धडक कामगार युनियनने अनेक प्रस्थापित कामगार नेत्यांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. कामगारांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विद्यमान कामगार नेते हादरले आहेत.
हल्लेखोर सराईत गुन्हेगार असावेत आणि अभिजीत राणे यांच्यावर दहशत निर्माण करणे हा त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो.
डॉ. दत्ता सामंत यांच्यावर ते गाडीत असताना प्राण घातक हल्ला झाला होता आणि तीच ‘मोडस ऑपरेंडी ‘ अभिजीत राणे यांच्या वरील हल्ल्यात वापरली जाते आहे.
गेल्या आठवड्यातील हल्ल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेतली. चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले. व्यक्तिशः अभिजीत राणे यांच्याशी त्यांनी संपर्क करून माहिती घेतली. देशभरातील पत्रकार संघटनांनी निषेध केला. मोर्चे निदर्शने शिष्ठ मंडळे यातून राणे यांना पाठिंबा दिला. पोलीस दल कसोशीने तपास करीत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न होतो ह्यामागे मोठे कारस्थान असणार यात शंका नाही.
“अभिजीत राणे यांच्या जीवाला धोका झाल्यास त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटल्या शिवाय राहणार नाहीत ” हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन काय पावले उचलते याकडे हजारो पत्रकार आणि लाखो कामगार यांचे लक्ष लागलेले आहे. (धडक कामगार युनियन द्वारा प्रसारित)