

विरार : मागील वर्षी नालेसफाईत केलेली कुचराई आणि बेसुमार झालेली अतिक्रमणे यामुळे वसई-विरार शहर पाण्याखाली गेले होते. परिणामी वसई-विरार महापालिकेवर मोठी नामुश्की ओढवली होती. गतवर्षीची पुनरावृत्ती या वर्षी होऊ नये व महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची सफाई करायला घेतल्याचे चित्र सध्या आहे.
विरार पूर्व ड़ी मार्ट परिसरातील नालेसफाईदेखील जोरात सुरू आहे.
एकीकडे कोविड-19 च्या संकटासोबत वसई-विरार महापालिका झगड़ते आहे. त्यात पावसाळा महिनाभरावर आला आहे. अशात वसई-विरार महापालिका आरोग्य यंत्रणेला दोन्ही पातळीवर काम करावे लागत आहे. कोविड-१९च्या संकटाशी लढण्यात आरोग्य यंत्रणा गुंतली असली तरी मागील वर्षी वसई-विरार शहरात पावसाळ्यात बुड़ाल्याचा अनुभव महापालिकेच्या गाठिशी असल्याने वसई-विरार महापालिकेला नालेसफाई करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.
दरम्यान; मागील वर्षी वसई-विरार शहरातील रेल्वे लाइनलगतच्या सखल भागांत पाणी तुंबले होते. त्यामुळे वसई-विरार महापालिकेकडून रेल्वे लाइनलगतच्या मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्यात येत आहे.