

प्रतिनिधी
कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या देशव्यापी लढाईत सगळेच जण आपापलं योगदान देत आहेत. देशातील वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करत पुढे रक्ताचा तुटवडा भासणार आहे. ही गरज लक्षात घेत नालासोपाऱ्याचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी रक्तदान करत एक अनोखं उदाहरण लोकांसमोर ठेवलं आहे.
लोकांचा जीव वाचवण्याची वेळ येते, तेव्हा मी सर्वात आधी पुढे सरसावेन, असं ठाकूर यांनी याआधीही अनेकदा स्पष्ट केलं होतं. आताच्या या संकटाच्या काळात रक्ताची गरज भासू शकते. त्यामुळे लोकांनी रक्तदानासाठी पुढे यायला हवं. पण हे फक्त सांगून काहीच उपयोग नव्हता. त्यामुळे मी स्वत: पुढे येऊन रक्तदान केलं. लोकांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे. त्यामुळे संकटकाळात त्यांच्या प्रतिनिधीनेच योग्य उदाहरण त्यांच्यासमोठ ठेवायला हवं, असं आमदार क्षितीज ठाकूर यांनी स्पष्ट केलं.
आरोग्यविषयक आणीबाणीचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आयोजित केलेल्या उपक्रमातही आमदार ठाकूर सहभागी झाले होते. कोणत्याही महामारीला सामोरं जाताना कोणत्या आठ प्रमुख गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याचं प्रशिक्षण त्यांनी याच उपक्रमात घेतलं. आता रक्तदानासाठी पुढे येत त्यांनी वसई-विरार-नालासोपाराच नाही, तर राज्यभरातील लोकप्रतिनिधींसमोर एक आदर्श उभा केला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आमदार क्षितीज ठाकूर यांनी याआधीही अनेक पावलं उचलली होती. आपल्या मतदारसंघासह वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक परिवहन बसगाड्या आणि रेल्वे स्थानके यांचं निर्जंतुकीकरण करण्यापासून ते लोकांना मोफत अन्नधान्य वाटपापर्यंत अनेक उपक्रम ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतले.
कोणत्याही लोकप्रतिनिधीने संकटाच्या काळात चारही बाजूंनी आपल्या लोकांची काळजी घेणं अपेक्षित असतं. मी काही वेगळं करत नसून नेमकं याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करत आहे. रक्तदान हेदेखील याचाच एक भाग आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं.