

वाडा (मनोज बुंधे)तालुक्यातील मोज गणातून निवडून आलेले पं.स.सदस्य सागर ठाकरे हे जनतेच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षांना सार्थकी ठरत अनेक विकास कामे आपल्या भागात व्हावीत यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहेत.यामध्ये मुख्य समस्या ही पिण्याच्या पाण्याची असल्याने त्यांनी या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत.
आपले वडील चंद्रकांत ठाकरे यांचा राजकीय वारसा पुढे घेवून जात असताना ठाकरे हे मोज गणातून पं.स. सदस्य म्हणून निवडून आले आहेत.ठाकरे यांनी दि.९ मे रोजी उपअभियंता,लघु पाटबंधारे उपविभाग ( पं.स.वाडा ) यांना आपल्या गणातील जुने बंधारे दुरुस्ती करणे आणि नवीन बंधारे बांधण्याबाबत अशी दोन पत्र दिली आहेत.या पत्रांमध्ये त्यांनी आपल्या गणातील विविध ठिकाणी उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याची पातळी खोल जाते,त्यामुळे विहिरी व विंधन विहीरी कोरड्या पडून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते.तसेच शेती व गुरे यांना पाणी मिळत नाही अशा विविध समस्या दूर करण्यासाठी त्यांनी सुचविलेल्या ५ जुने बंधारे दुरुस्ती आणि ३ नवीन बंधारे बांधण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे,असे सुचविले आहे.
सागर ठाकरे हे याआधी मोज ग्रामपंचायत चे उपसरपंच असल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली असल्याने यावर काहीतरी उपाय करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही पत्र दिली आहेत.
आपल्या समस्यांची जाणिव असलेला लोकप्रतिनिधी पं.स.मध्ये निवडून दिल्याने जनतेला त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना ते सार्थकी ठरत असून त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांची प्रशंसा आणि आभार व्यक्त केले जात आहेत.