वसई(अतुल साळवी):सध्या सार्‍या देशात कोरोना ने धुमाकुळ घातला आहे. प्रशासन विविध माध्यमातून सोशल डिस्टंस ठेवण्याचे आवाहन करीत आहे. जनतेने एकमेकांपासून किमान एक मिटरचे अंतर ठेवावे , तोंडावर मास्क घालावे, सेनिटायझरने हात स्वच्छ धुवावे असे एक ना अनेक प्रकारे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध सुचना देत आहे.
शासना तर्फे कोरोनावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असताना एटिएम सेंटर कोरोनाचा प्रसार करण्यास कारक ठरू शकतात .
आज शहराच्या कानाकोपर्‍यात एटिएम सेंटरच्या माध्यमातून लोकांना पैसे काढण्याची सुविधा देत असतात . पण सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात सर्वच एटिएम सेंटरनी निष्काळजीपणाचा कळसच गाठला आहे.
टाळेबंदीच्या काळात बँकांवर मर्यादा आल्या आहेत. बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लावण्यापेक्षा घरा जवळच असलेल्या एटिएम सेंटरवर जाणे लोकं पसंद करतात.
एटिएम सेंटर बाहेर नियमा प्रमाणे १ मिटरचे अंतर ठेवून शांततेत व शिस्तीत एटिएम सेंटर मध्ये प्रवेश करतात पण . . . .
या एटिएम सेंटरवर दिवसभरात शेकडो लोक मशिन हाताळतात. पण या एटिएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांच्या आरोग्याची तपासणी केली जात नाही. त्यांचे शारिरीक तापमान देखील तपासले जात नाही. सेनिटायझरची सुविधाच ठेवण्यात आली नसल्याने हात स्वच्छ न करताच लोक मशिन हाताळत आहेत . येथे पैसे काढणार्‍या लोकांपैकी एखादा जरी कोरोना पोझिटिव्ह निघाला तर ह्या विषाणूचा प्रसार किती मोठ्या प्रमाणात होवू शकतो ? याचा विचार न केलेला बरा.
बँकांनी जनतेला सेवा पुरविताना त्यांच्या सुरक्षेची देखील काळजी घेण जरूरीच आहे. त्यामुळे या एटिएम सेंटरच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आहेत मान तपासणी साहित्य उपलब्ध करून देणे नितांत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *