

राजस्थान, उत्तरप्रदेश आणि ओरिसासाठी सहा ट्रेन वसईतून सुटणार
—- स्वप्नील तांगडे, प्रांत अधिकारी, वसई
वसई:- मजूर, कामगार वर्ग आणि अन्यही नागरिक अजूनही मोठ्या संख्येने पायी किंवा टेम्पो, ट्रक अश्या अवैध वाहनांतून धोकादायक अवस्थेत प्रवास करीत असून, हे त्वरित थांबले पाहिजे. या सर्वांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी शासनाची असून, ज्यांच्याकडे भाड्यासाठी पैसे नाहीत अश्यांच्या तिकीटाची जबाबदारी शासन उचलणार आहे. आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. राजस्थान, उत्तरप्रदेश आणि ओरिसासाठी सहा ट्रेन लवकरच वसईतून सुटणार आहेत. त्या शिवाय अन्य राज्यातही ट्रेन पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती वसईचे प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, वसईचे तहसीलदार किरण सुरवसे आणि प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी आज तहसीलदार कार्यलयात वसई तालुक्यातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मजूर, तथा परराज्यातील प्रवासी स्थलांतराबाबत पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि जौनपूर साठी गतसप्ताहात दोन ट्रेन पाठविण्यात आल्या असून, आता राजस्थान साठी दोन , उत्तरप्रदेश साठी तीन आणि ओरिसासाठी एक मिळून अश्या सहा ट्रेन प्रत्येकी 1600 प्रवासी घेऊन वसईतून पाठविण्यासाठी त्या त्या राज्यांना कळविण्यात आले आहे. त्यापैकी राजस्थान सरकार कडून पाली येथे न्यावयाचे ट्रेनसाठी तेथील प्रशासनाकडून संमती आली असून, ही ट्रेन एक-दोन दिवसात पाठवली जाईल.या शिवाय राज्य-आंतरराज्य प्रवासासाठी खाजगी प्रवास करू इच्छिणाऱ्या 14 हजार वाहनांना आतापर्यंत परवाने दिले आहेत. शासनातर्फे लॉकडाऊन काळात गरीब आणि गरजूंसाठी 12 कम्युनिटी किचन आणि 103 वाटप केंद्रांद्वारे तालुक्यात दरदिवशी सकाळ, सायंकाळ मिळून एक लाख 13 हजार अन्नाचे टिफिन आतापर्यंत वितरित केल्याचे तांगडे यांनी बोलतांना स्पष्ट केले. वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यावेळी बोलतांना आवाहन केले की , अवैध मार्गाने प्रवास करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात, असून त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचाही धोका अधिक आहे. रेल्वे ट्रॅक किंवा मालवाहू वाहनातून घातक प्रवास करू नये, दुचाकीवर एकानेच आणि चार चाकी वाहनांतून तिघांनीच उचीत कारण आणि पास घेऊन प्रवास करावा. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि दहा वर्षाखालील मुलांनी बाहेर पडू नये. वैद्यकीय कारणाशिवाय सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये. गेल्या दीड महिन्यात कर्फ्यू मोडल्याबद्दल जप्त करण्यात आलेल्या तालुक्यातील हजारो दुचाकी आणि अन्य वाहने परत करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे दिलासादायक आश्वासन सुद्धा सागर यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑनलाईन लिंकवर लाखो इच्छुक प्रवाश्यांनी नोंदणी केली असून, मात्र त्या संबंधी फॉर्म भरतांना अनेकांनी सदोष भरला असल्याने या प्रवाश्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, राज्य आणि शहरांच्या याद्या अपडेट करण्यासाठी 25 जणांची टीम कार्यरत आहे. या याद्या निश्चित झाल्यावर 1600 प्रवाश्यांसाठी एक या प्रमाणे ट्रेन उपलब्ध करून देता येईल, तसेच त्याशिवाय राज्य परिवहन मंडळाची बस सुविधा पर राज्यांच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार किरण सुरवसे यांनी यावेळी दिली.