
◆ “सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांची उच्च न्यायालयात याचिका!
◆ कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्याच्या मागणी!
विरार – वसई विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वसई-विरार शहरात तसेच जिल्ह्यात वाढत असलेले कोरोनाबाधित ८० टक्के रुग्ण हे मुंबईतील रुग्णालय, हॉटेल्स आणि अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत असे निदर्शनास आले आहे.मुंबई शहरामध्ये अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मुंबईतील पॉजिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्याने मोठ्या प्रमाणामध्ये लागण झालेली आहे.शिवाय या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना धोका वाढलेला आहे.त्यामुळे ‘कोरोना’ रोखण्यासाठी मुंबई सारख्या हॉटस्पॉट क्षेत्रात जीवाची जोखीम पत्करून अत्यावश्यक सेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणाजवळ तात्पुरती निवास व्यवस्था करावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रसारमाध्यमातून केली जात आहे.परंतु या कर्मचाऱ्यांची आतापर्यंत कोणतीच व्यवस्था न केल्याने अखेर पर्यावरण सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार असून संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
याचिकाकर्ते भट यांनी युवाशक्ती एक्सप्रेसकडे बोलताना सांगितले की, मुंबईत या आजारावर मात करण्यासाठी वसई विरार पालिका क्षेत्रातील तसेच पालघर जिल्ह्यातील डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस अधिकारी-कर्मचारी, महसूल अधिकारी, मुंबई महापालिकेतील कर्मचारी दररोज मुंबई शहरात ये-जा करीत आहेत.अंदाजे ३००० हजार कर्मचारी येथून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जात आहेत.
यासाठी बेस्टने १२० बसेसची विशेष व्यवस्थादेखील केली आहे.या कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावून पुन्हा जिल्ह्यात यावे लागत आहे. त्यातून कोरोनाची लागण झाल्यास संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला धोका उद्भवत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन मुंबई सारख्या हॉट स्पॉट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सेवेच्या ठिकाणाजवळच तात्पुरती निवास व्यवस्था करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. परिणामी कोरोनाचा संसर्ग टळण्याबरोबरच कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याला धोका उद्भवणार नाही.शिवाय मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या या कर्मचारी वर्गास ते राहतात त्या इमारतीत, सोसायटीत, गावात तसेच आसपासच्या परिसरात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील विलगीकारण सारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधात लढताना एकप्रकारे तारेवरची कसरत करावी लागत आहे.या सर्व बाबींचा सारासार विचार करून शासनाने या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विषाणूचे जे वहन होत आहे. त्या धोक्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. परिणामी मुंबईत सेवा बजावणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची रोज वाहतूक करण्याऐवजी सदर कर्मचाऱ्यांना मुंबईत राहण्याची सोय उपलब्ध करून दिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणार नाही.
दरम्यान या प्रकाराकडे याचिकाकर्ते चरण भट यांनी न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी वसई विरार तथा पालघर जिल्ह्यातून रोज मुंबईत जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईतच केल्यास वसई विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव फोफावणार नाही असे भट यांनी याचिकेत म्हटले आहे. भट यांनी मुंबई महापालिका आयुक्त, मुंबई जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, पालघर जिल्हाधिकारी व वसई विरार महापालिका आयुक्त यांना याचिकेत पक्षकार केले आहे. मंगळवारी याचिका दाखल करून घेताना न्यायालयाने संबंधित पक्षकारांकडून या संदर्भात स्पष्टीकरण मागितले असून शुक्रवारी यावर पुढील सुनावणी होईल.
कोरोना विषाणू पसरु नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले.सर्व राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या तसेच प्रत्येक जिल्हा, गाव या सर्व ठिकाणी नियम लागू करण्यात आले.पालघर जिल्ह्यात गेल्या १५-२० दिवसात जे विदेशी प्रवाशी होते (होम क्वारंटाइन करण्यात आले) त्या कोणाचा ही नविन पॉजिटिव केस आढळले नाही.परंतु जे अत्यावश्यक सेवा मध्ये काम करणारे कर्मचारी आहेत (पोलिस, रुग्णवाहिका कर्मचारी,डॉक्टर,रुग्ण परिचारिका इ.) जे रोज पालघर जिल्हातून मुंबई ये-जा करतात त्यांना या विषाणूची लागण होत आहे,त्यांना लागण झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा या विषाणूची लागण जाले आहे.दुसऱ्या जिल्ह्यातून पालघर ,वसई, विरार ये-जा करणारे कर्मचारी(अत्यावश्यक सेवा) यांवर बंदी घालावी किंवा त्यांच्या राहण्याची सोय त्याच जिल्हा मध्ये करण्यात यावी.जेणेकरून त्यांना ये-जा करावी लागणार नाही.कारण हा एक प्रकारे संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्यांना सुद्धा एका ठिकाणी राहणे खूप गरजेचे आहे.अन्यथा हा विषाणू खुप मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.
सध्या पालघर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील बहुतांश रुग्ण हे मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावत असलेले असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे वेळीच उपाययोजना करून या अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाची मुंबईतच पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.परंतु संबंधित प्रशासन या कर्मचाऱ्यांची पर्यायी व्यवस्था करण्यास दिरंगाई करीत आहेत. परिणामी पालघर जिल्यातील कोरोनाची स्थिती गंभीर बनू लागली आहे.
-चरण भट(याचिकाकर्ते)