
पावसाला अवघे वीस ते पंचवीस दिवस राहिले आहेत.पावसाळा जवळ आला म्हणुन पुर्वी अत्यानंद व्हायचा.आता भिती वाटते.गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये पावसाने वसईत जो हाहाकार माजवला आहे तो झोप उडवणारा आहे.प्रत्येक वर्षी त्याची तिव्रता वाढत चालली आहे.याही वर्षी काही वेगळे घडणार नाही.याही वर्षी वसई बुडणार आहे.त्याची चिन्हे दिसु लागली आहेत.
मंगळवारी मी वसई स्टेशन परिसरात गेलो होतो.मनाला दिलासा मिळेल असे कोणतेही चित्र दिसले नाही.कोरोनामुळे लाँकडाऊन आहे.याचा अर्थ प्रशासनाने वेगळा लावला आहे.लाँकडाऊन म्हणजे शहर आहे तसे सोडुन देणे असे नाही.दुर्दैवाने मला तसे दिसले.पापडी ते वसई स्टेशन म्हणजे फारतर सात किलोमिटरचे अंतर.या अंतरामध्ये मला शहर अस्वच्छ दिसले.रस्त्यावर मातीचे ढीग आणि रस्त्याच्या कडेला मातीचे डोंगर दिसले.मी स्थानिक नगरसेविकेकडे तक्रार केली.परिणाम शुन्य.गेल्या अनेक वर्षांचे हे चित्र आहे.लाँकडाऊनच्या काळात तरी हे चित्र बदलायला पाहिजे होते.बहुजन विकास आघाडीने ही संधी गमावलेली आहे.लाँकडाऊन मध्ये जेवणाची पँकेट्स वाटणे ठीक आहे.पण लाँकडाऊनच्या काळात शहराच्या आरोग्याची देखील काळजी घेणे अगत्याचे आहे.ती न घेतल्याने वसईवर यावर्षी जीवघेणी आपत्ती येणार आहे.कोरोनाला तेव्हढेच हवे आहे.
वसईच्या वाताहतीला ऐंशीच्या दशकात सुरुवात झाली.त्याअगोदर वसईला मुंबईचे फुफ्फुस म्हणत.मुंबईला प्राणवायु पुरविण्याचे काम वसई करीत असे.वसईतील घनदाट वनराई,खोलवर पोहचलेल्या खाड्या,अथांग समुद्र,नद्यांची पात्रे आणि पुर्वेच्या डोंगरमाळा यामुळे जगातील एक संपन्न प्रदेश अशी वसईची ओळख होती.जो आला तो ईथे वसला. अशोकाच्या काळापासुन ईथे लोक आले आणि विसावले.स्वातंत्र्योत्तर काळात बाहेरुन जी जी सरकारी कर्मचारी,डॉक्टर,शिक्षक मंडळी येत त्यांना वसईचा लळा लागे.ते पुढे वसईकर बनुन जात.त्यांच्या द्रुष्टीने वसई हिवाळ्यात गोवा आणि उन्हाळ्यात महाबळेश्वर असे.मुळच्या वसईकरांनी देखील त्यांना आपले मानुन घेतले.त्यावेळचे वातावरण त्यास पोषक होते.गांधीजीच्या आणि नेहरुंच्या विचारांचा त्यांच्यावर फार पगडा होता.वसईतील धर्मनिरपेक्षता देशाला आदर्श ठरावी अशी होती.
मी गेल्यावर्षी जपानला गेलो होतो.क्योटो शहराच्या मुकायजिमा या उपनगरात राहत होतो.निसर्गाने नटलेल्या या उपनगराची मांडणी उत्तम प्रकारे करण्यात आलेली आहे.आपण जणु स्वर्गराज्यात राहत आहोत असा मला भास होऊ लागला.सगळं शहर मोकळे ढाकळे.शहरात गावाचे वातावरण.ईमारती एकमेकापासुन किमान शंभर मिटर लांबवर.छोटी छोटी घरे एकमेकापासुन सुयोग्य अंतर सोडुन.शहरात हजारोंनी झाडे.मैदाने बागबगीचे विचारु नका एव्हढ्या संख्येने.जिथेतिथे फुलांचे ताटवे.प्रत्येक शेतापर्यंत बंदिस्त पाईपांनी पाणीपुरवठा.नदीच्या पात्रातुन कँनलमध्ये आणि कँनलमधुन थेट शेतीपर्यंत पाण्याची व्यवस्था.घाणीचे पाणी आहे की स्वच्छ पाण्याचे ओहळ आहेत असा प्रश्न पडावा ईतकी स्वच्छ गटारे. आसमंतात धुंद करुन सोडणारा फुलांचा सुगंध. हे सारे मी मुकायजिमामध्ये अनुभवले.माझ्या मुलाला,प्रसन्नराज याला मी म्हणालो काय रे असे वातावरण वर्षभर असते का?तो हो म्हणाला.थंडीमध्ये वातावरणातील शांतता आणि स्तब्धता माणसाला ह्रदयाच्या आतल्या कप्प्यात नेऊन सोडते आणि ३८ डिग्री सेंटीग्रेडच्या कडक उन्हाळ्यात पिकलेल्या पानांच्या, पिवळ्या गवताच्या वासाने मन विभोर होऊन जाते असे तो म्हणाला.माणसाला यापेक्षा अधिक काय हवयं?परतु नये असे वाटणारे सारे चित्र तिथे आहे.
त्या सगळ्या काळात मला कुणाची आठवण यायची?मला आपल्या वसईची वारोंवार आठवण यायची.मी तुलना करायचो.तुलनेत मला वसई अधिक उजवी वाटायची.मुकायजिमाच्या तुलनेत वसई काकणभर सरस ठरेल.पस्तीस वर्षांपूर्वी मी उत्तन डोंगरी येथे गेलो होतो.तेथुन वसईचे घेतलेले दर्शन आजही डोळ्यापुढुन हलत नाही.मी अमेरिकेचा कँलेफोर्निया बघतो की काय असा मला भास झाला.बशीसारखा उभट असलेला वसईचा भुप्रदेश जगातील सर्वोत्तम प्रदेशापैकी एक आहे.आज ती उत्तन डोंगरीही राहिली नाही आणि वसईही राहिली नाही.
लहानपणी घरातुन शाळेपर्यंत जाणे म्हणजे धुंद करुन सोडणार्या फुलांच्या सुगंधांची सैर असायची.वसईचा पश्चिमपट्टा म्हणजे विविध फुलांच्या रंगबरसातीचा आणि सुगंधांचा मिश्र अनुभव असायचा.दुर्गा भागवतांचे ऋतुचक्र आठवते.ऋतुचक्र वाचण्याचे ते वय होते.जंगल भ्रमंतीत गवसलेले ऋतुंचे अनोखे जग दुर्गा भागवतांनी आम्हाला खुले केले.आमच्या वसईत आम्ही ते अनुभवत होतो.ऋतुचक्र आजही आमच्या काळजातील एक कोवळे पान आहे.लहानपणी एकदा मे महिन्यात माझ्या बहिणीच्या,बेबीच्या घरी नंदाखाल येथे गेलो होतो.रात्री टेरेसवर झोपायचे भाग्य लाभले.बेबीने अंगावर ओढायला चादर दिली होती.मे महिन्यात चादर?माझ्या मनात प्रश्नचिन्ह होते.पहाटे होता होता अंग गारठुन गेले.अलगद चादर अंगाला लपेटुन घेतली.अशी होती ती वसई.मुकायजिमाला देखील मागे टाकणारी.
अशी ही वसई ऐंशी नंतर बदलत गेली.तोपर्यंत कर्जबाजारी असलेले कंत्राटदार बिल्डर बनले.वसईच्या वाताहतीची ती सुरुवात होती.स्टेशन परिसरात ईमारती डोकावु लागल्या.गावागावात घरबांधणीला वेग आला.खारटणाच्या जागेत दिवसरात्र बांधकामे होऊ लागली.परप्रदेशातील माणसे झुंडीच्या झुंडीने तालुक्यात अवतरु लागली.बांधकामात पैसा असतो हे कळाल्याने अनेक बिल्डर झाले.पण बिल्डर झाला म्हणुन सगळी अक्कल आली असे होत नाही.ईमारती बांधण्यासाठी काही कायदे असतात हे या तथाकथित बिल्डरांना ठाऊक नव्हते.दिसेल तिथे,जमेल तिथे बिल्डिंग ठोका असा प्रकार चालु झाला.महसुलीच्या सगळ्या कायद्यांना तिलांजली मिळाली.तोपर्यंत तीन हजार फुट जागेमध्ये एक हजार फुट बांधकाम करता येई.हा कायदा धुडकावून लावण्यात आला.मुकायजिमामध्ये आजही हा कायदा आहे.बांधकामे करण्याअगोदर जिल्हाधिकार्यांची परवानगी घ्यायची असते हे कुणाला ठाऊक नव्हते.मागणी वाढल्याने आज भुमीपुजन,उद्या पायाभरणी आणि परवा बुकींग असे प्रकार वाढले.कारवाईची भिती नसल्याने बेकायदा बांधकामे वाढत गेली.कालपरवा फाटकी पायतणे घालुन फिरणाऱ्यांकडे अँब्यासेडरी दिसु लागल्या.भ्रष्टाचाराला प्रचंड उत आला. सर्वपक्षीय पुढारी बिल्डर झाले.अतोनात पैसा दिसु लागल्याने गुन्हेगार या व्यवसायाकडे वळु लागले.तोपर्यंत माहित नसलेले भुमाफिया आणि बांधकाम माफिया हे शब्द जीभेवर घोळु लागले.महसुल खात्याने,नगरपालिकेने,ग्रामपंचायतींनी आणि पोलीसांनी कानावर हात ठेवले.वसईच्या दुर्दशेची ती चिन्हे होती.खुन,खंडण्या,बलात्कार आणि जमीनी बळकावण्याचे धंदे अस्तित्वात आले.
१९९० मध्ये हितेंद्र ठाकुर पहिल्यांदा विधानसभेवर निवडुन गेले.तोपर्यंत स्टेशन परिसर,चुळणे आणि नंदाखाल पाण्यात बुडु लागले.पर्यावरणाच्या र्हासाची ती निषाणी होती.अनिर्बंध बांधकामामुळे,जंगलतोडीमुळे आणि वायुप्रदूषणामुळे प्रुथ्वीचा तोल बिघडु लागला होता.त्याची सर्वात प्रथम जाणीव झालेल्यामध्ये हरीत वसई संरक्षण समितीचा समावेश होता.वसई वाचवा हा तिचा नारा होता.अनेक थोरामोठ्यांचा तिला आशीर्वाद होता.बांधकामांना लगाम लागावा म्हणुन हजारोंचे मोर्चे समितीने काढले.ख्रिश्चनांची चळवळ म्हणुन ती दडपण्याचा प्रयत्न झाला.राज्य स्थरांवरील सत्ताधिकार्यांचा आणि बदनामीचा त्यासाठी गैरवापर करण्यात आला.मध्यंतरीच्या काळात हितेंद्र ठाकुरांची ताकद वाढत राहीली.
१९८९ ला सिडको आली.सिडकोमुळे प्रचंड भ्रष्टाचार आला.नियोजनपुर्ण शहर बाजुला राहु द्या.अगदी सिडकोच्या प्ल्यानमध्ये जे भाग डी.पी. रोडसाठी,गार्डनसाठी, आरक्षीत कारणासाठी,डंपिंग ग्राऊंडसाठी सोडले होते तेथे प्रचंड बांधकामे झाली.सरकारी जमीनी स्वत:च्या मालकीच्या असल्याप्रमाणे बांधकामासाठी वापरल्या गेल्या.त्याविरोधात झालेली प्रत्येक ओरड दाबण्यात आली.त्याचा द्रुष्य परिणाम दिसु लागला.ज्या वसईत सुगंधी वातावरण होते तिथे गटार गंगा वाहु लागल्या.सन २०००पासुन प्रत्येक वर्षी वसई पाण्यात बुडु लागली.आज वसईची लोकसंख्या २५ लाखांच्या वर आहे. ५ लाख लोकांना पुरतील एवढ्याही सुविधा वसईला उपलब्ध नाहीत.पाणी समुद्रात वाहुन जाण्याच्या सगळ्या जागा बेकायदा बांधकामांनी व्यापलेल्या आहेत.गेल्या दोन वर्षींपासुन त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत.वसई स्टेशन परिसरापासुन,विरारपर्यंत ते थेट मेढ्यापर्यंत काही दिवस जुलै आँगस्ट महिन्यात वसई पाण्यात बुडुन होती.सामान्यांचे अतोनात हाल झाले.बहुजन विकास आघाडीला तो ईशारा होता.
गेली तीस वर्षे बहुजन विकास आघाडीकडे वसईची संपुर्ण सत्ता आहे.एव्हढा कालावधी ईतिहासात ठसा उमटविण्यास पुरेसा असतो.निदान यावर्षी तरी बहुजन विकास आघाडी पावसाच्या पाण्यातुन निर्माण होणार्या समस्यांपासुन वसईची सुटका करील अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षांचा पुर्ण होतील असे दिसत नाही. वसई बुडेल अशी शक्यता आहे.जी कामे पावसाळा संपतासंपता प्रशासनाला हाती घेण्यास बहुजन विकास आघाडीने भाग पाडायला हवे होते त्या कामाची सुरवात देखील अजुन चालु झाली नाही.उलट मी असे ऐकतो की सद्या जे नवीन पालिका आयुक्त आलेले आहेत ते गंगाधरन बहुजन विकास आघाडीला दाद देत नाहीत.तसे असेल तर वसई मुकायजिमाचा दर्जा कधीही गाठु शकणार नाही.