
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांची माहिती
विरार : उन्हाळी सुट्टीनिमित कोकणात जाणार्या प्रवाशांना जादा भाडे आकारल्याप्रकरणी वसई परिवहन विभागाने वसईतील सात ट्रॅव्हल्सविरोधात कारवाई केली असून, त्यांच्याविरोधात मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वसईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली. कारवाई केलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये शुभश्री टॅव्हल्स, दशभुजलक्ष्मी ट्रॅव्हल्स, सोनलकर ट्रॅव्हल्स, वैभव टॅ्रव्हल्स, साई गणराज ट्रॅव्हल्स, वैभवलक्ष्मी ट्रॅव्हल्स आणि ओम साई राम टॅ्रव्हल्स यांचा समावेश आहे.
विरार-मनवेल पाडा येथून कोकणात अनेक लक्झरी बस जातात, मात्र या बससाठी बुकिंग घेणार्या एजंटकडून उन्हाळी सुट्टीचा फायदा घेऊन प्रचंड प्रमाणात प्रवाशांची लूट करण्यात येत होती. कोकण बस चालक-मालक संघाने या एजंटना कोकणातील प्रत्येक टप्प्यासाठी दरपत्रक ठरवून दिलेले होते, मात्र त्यानंतरही हे एजंट प्रवाशांकडून जादा तिकीट दर वसूल करत होते. कोकणात सावंतवाडी 600 रुपये, कुडाळ 600 रुपये कणकवली 550 रुपये, तरळे 550 रुपये, नांदगाव 550 रुपये खारेपाटण 500 रुपये, राजापूर 500 रुपये, तर रत्नागिरीसाठी 500 रुपये तिकीट दर आहे. वाढलेले डिझेल दर आणि नादुरुस्त रस्त्यांमुळे कोकण बस चालक-मालक संघटनेने या दरांत 14 ऑक्टोबर रोजी वाढ करून अनुक्रमे सावंतवाडी, कुडाळ, कणकवली 700 रुपये, तरळे 600, नांदगाव, खारेपाटण, राजापूर आणि रत्नागिरीसाठी 500 रुपये दर ठरवून दिला होता. वरील नमूद केलेले दर हे एप्रिल-मे महिना व गणेश चतुर्थी तसेच लागून येणार्या सरकारी रजा यांच्याव्यतिरिक्त असतील, असेही नमूद केले होते. त्यानंतरही हे नियम धुडकावून 750 रुपये ते 950 रुपयांपर्यंत बुकिंग घेणार्या एजंटकडून तिकीट दर आकारले जात होते.
या बाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वसई परिवहन विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास विरार-मनवेलपाडा, सातीवली रोड, तुंगारेश्वर फाटा, रेेंज रोड या ठिकाणी ट्रॅव्हल्सची पाहणी केली. यात ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची यादी व फोन नंबर घेऊन तपासणी केली असता, प्रवशांना जादा दर आकारल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार परिवहन विभागाने या ट्रॅव्हल्सविरोधात ही कारवाई केली आहे
ट्रॅव्हल्सकडून आकारण्यात येणार्या जादा दराबाबत बस ओनर असोसिएशनला कळवलेले आहे. जादा दर आकारणीबाबत कुणाचीही तक्रार येता कामा नये, अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात आलेली आहे. याशिवाय परिवहन विभागाकडून अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहेे.
- अनिल पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई
27 एप्रिल 2018 ने सरकारने अध्यादेश काढला होता. हा अध्यादेश धुडकावून वसईतील टॅ्रव्हल्सकडून जादा दर आकारण्यात येत असल्याचे वसई परिवहन विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी साडेचार वाजता केलेल्या तपासणीत आढळून आले. त्यानुसार या ट्रॅव्हल्सना मेमो देण्यात आला असून, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे परिवहन कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- बालाजी बोंदरवाड, मोटर वाहन निरीक्षक, वसई परिवहन विभाग