सध्या भारताला शेजारी कोणी मित्रराष्ट्र राहिला नाही असे दिसते.पाकिस्तान आणि चीन हयांना भारताचे जन्मजात वैरी मानण्यात येते.ते आपले मित्र बनावेत म्हणुन कोणी बोलले तर मोठा राष्ट्रद्रोह समजण्यात येतो.लालकृष्ण अडवाणीनी महमंद अली जिनांवर चार स्तुतीची सुमने उधळली होती.त्याबरोबर त्यांना राजकारणातुन हद्दपार करण्यात आले.चीनचे शासक राक्षस आहेत अशी आपल्याकडे समज करुन देण्यात आलेली आहे.बांगलादेश कालपर्यंत आपले मित्रराष्ट्र होते.भारतीय नागरिक कायद्यामध्ये केलेल्या सुधारणेवरुन बांगला बिथरला आहे.त्यात मुस्लीमांना लक्ष्य केलेले आहे हा बांगला देशाचा आक्षेप आहे.श्रीलंकेविषयी आपण खात्रीने काही सांगु शकत नाही.चीन बरोबर श्रीलंकेचे अनेक मैत्रीचे करार आहेत.श्रीलंका अल्पसंख्य तामिळांना सावत्रपणाची वागणुक देत आलेला आहे. त्याचा विसर आपल्या तामिळी लोकांना कधीही होणार नाही.श्रीलंका ते जाणुन आहे. परवा नेपाळ गुरगुरला तेव्हा ५५०० व्होल्टचा झटका बसला.कालपरवापर्यंत नेपाळ हे जगातील एकमेव हिंदु राष्ट्र होते.भारतात बहुसंख्येने हिंदु राहातात.त्यामुळे नैसर्गिकरित्या भारताला पुर्वीपासुन नेपाळबाबत एक आत्मियता आहे.नेपाळमध्ये आता मार्क्सवादी विचारांचे सरकार आहे.या सरकारने नुकताच नेपाळचा नवीन नकाशा प्रसिद्ध केला.त्यामध्ये भारताचा किमान अडिचशे चौरस किलोमीटरचा प्रदेश नेपाळमध्ये असल्याचे दाखवण्यात आलेले आहे.नेपाळ भारतापुढे चिमुकला देश आहे.अनेक गोष्टींसाठी त्याला भारतावर अवलंबुन राहावे लागते.आर्थिक ताकदीतही नेपाळ भारताच्या मागे आहे.असे असुनही नेपाळने भारताशी उघडउघड पंगा घेतलेला आहे.समजण्यापलीकडचे हे प्रश्नचिन्ह आहे.भारत एकाकी पडत जाण्याची भिती वाटते.
या परिस्थितीत भारतीयांनी कसे वागायला पाहिजे याचा विचार करण्याची ही वेळ आहे.नपेक्षा भारताच्या सार्वभौमवत्माला मोठा धोका पोहचु शकतो.जागतिक पातळीवर भारताला अनेक मित्र आहेत.पण परिक्षा भारताला द्यावयाची आहे.आज जे जगात चित्र आहे ते पाहता विकसित राष्ट्रे स्वत:च्या अंगाला कोणताही चिखल लावुन घेत नाहीत हे दिसते.तुर्कस्थानाच्या अंगणाशेजारी सिरीयाची लावुन द्यायची आणि आपण लांबुन मजा पाहायची अशी त्यांची कुटनिती आहे.पुढेमागे आणिबाणीची परिस्थिती आली तर कोणी आपल्यासोबत प्रत्यक्षात रणांगणात उतरेल अशी शक्यता कमी आहे.अशा या कठीण समई,विशेषकरुन कोरोनाच्या काळात आपण सर्व भारतीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे.भारत जोडो ही चळवळ चालु करण्याची ही वेळ आहे.आपापसातले हेवेदावे,तिरस्कार,आपपरभावना आणि खर्या देशभक्तीचा अभाव त्यागण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.
भारत जोडोची पहिली हाक बाबा आमटे यांनी दिली होती.१९८५ साली आमटेंनी दिलेल्या हाकेला असंख्य तरुणांनी प्रतिसाद दिला होता.कुष्ठरोग्यांसाठी चालविलेले अलौकिक कार्य काही काळासाठी आमटेंनी थांबविलेले होते.देश विघटनाच्या वाटेवर आहे असे चित्र निर्माण झाले होते.पंजाब खदखदत होता.१९८४ साली आँपरेशन ब्ल्यु स्टार झाले होते.भिद्रनवाल्यांपासुन सुवर्ण मंदीराची सुटका करण्यात आली होती.तरी सारा पंजाब अशांत होता.नक्षलवादी चळवळही जोरात होती.जनसामान्य अस्वस्थ होते.अशावेळी भारतजोडोचे शिवधनुष्य आमटेंनी हाती घेतले.देश एकसंघ राहिला तर देशवासी सुखी राहतील ही त्यामागची भावना होती.
बाबा आमटेंचे चारित्र्य देखील तेव्हढेच संपन्न होते.मदर तेरेसा,पटवर्धन,बाबा आमटे आदीचे आदर्श त्यावेळी आमच्या समोर होते.वसईमध्ये आम्ही कुष्ठरुग्ण सेवा चालु केलेली होती.ललीताबेन राजाणी,मुख्तार मुल्ला आदींना साथीला घेऊन आम्ही कुष्ठरुग्णाच्या सेवेसोबत त्यांच्या हक्कांबाबत लढत होतो.त्यासाठी युवा जाग्रुती संघटनेच्या माध्यमातुन आम्ही विशीतिशीतील तरुण झपाटल्यासारखे काम करीत होतो.समाजसेवेपुरती आमची वाटचाल चालु होती.तेव्हढ्यात आमटेंनी भारत जोडोची गर्जना केली.आम्ही सार्यानी त्या चळवळीत स्वतःला झोकुन दिले.एका राष्ट्रीय चळवळीचा आम्ही हिस्सा बनलो.राष्ट्रप्रेमाने आम्ही भारावुन गेलो.बाबांच्या यात्रेत सामील होण्यापासुन ते त्यांचे साहित्य विकण्यापर्यंत,जागोजागी भित्तीपत्रके लावण्यापासुन ते देशभक्तीपर प्रचार साहित्य वाटण्यापर्यंत सारी कामे आम्ही जीव तोडुन केली.मला अजुनही एक योगायोगआठवतो. त्यावेळी १९८६मध्ये एकाच समई पोप जाँन पाँल दुसरे आणि बाबा आमटे मुंबईमध्ये दाखल झाले होते.पोपसाहेब म्हणजे जागतिक व्यक्तीमत्व.त्यातही त्यांचा करिष्मा जगावेगळा होता.पोपसाहेबांनी पोलंड देशाची सोव्हिएत युनियनच्या पाशातुन मुक्तता करण्यासाठी जिवाची बाजी लावली होती.त्यांचे दर्शन होणे म्हणजे एक पर्वणी होती.लाखोंच्या रांगा त्यांच्या दर्शनासाठी लागल्या होत्या.आम्ही मात्र बाबासाहेबांच्या स्वागताला वाहुन घेतले होते.मुंबईत त्यांचे मोठे स्वागत झाले. त्यात आम्ही सहभागी होतो.राष्ट्रप्रेमाची नशा काही और असते.आमच्या राष्ट्रप्रेमाचे बक्षीसही आम्हाला ताबडतोब मिळाले.दादरला एका कोपर्यात आम्ही युवा जाग्रुतीचे काही कार्यकर्ते उभे होतो.तेव्हढ्यात आमच्या अगदी जवळुन पोपसाहेबांचा ताफा गेला.काचेच्या बंद कारमधुन उभे असलेले पोप आम्हा सार्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत होते.
राष्ट्रप्रेम म्हणजे रोमँनटिक आयडिया नाहीत किंवा हवेतल्या बाता नाहीत. हे आम्ही त्या चळवळीतुन शिकलो.हिंदुस्थान झिंदाबादच्या नुसत्या घोषणा पुरेशा नसतात.ज्यांच्याकडे नाही त्यांना द्यायचे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवायचा हे आम्ही त्या आंदोलनातुन शिकलो.बाबा आमटेंवर महात्मा गांधींचा फार प्रभाव होता.आमच्यापर्यंत केवळ गांधीद्वेष पोहचलेला होता.गांधीजींमुळे देशाची फाळणी झाली ईथपर्यंत आमचे प्रबोधन करण्यात आलेले होते.बाबा आमटे म्हणत होते जग जोडायचे असेल तर गांधीजींना पर्याय नाही.म्हणुन पुन्हा एकदा गांधीजी वाचुन काढले.सोबत नेहरुंना वाचले.गांधीजीनी या देशावर प्रचंड उपकार केल्याचे आढळुन आले.गांधींनी देशाला अहिंसेचा मंत्र दिला.चातुरवर्ण मानणारे गांधीजी बदलले.थेट दलीतांच्या वस्तीत जाऊन बसले.देश जोडण्यासाठी असंख्य अपमान सहन केले.आपली विश्वकिर्ती बाजुला ठेवुन कुणाशीही समन्वयाच्या चर्चा केल्या.स्वतंत्र भारताचा निधर्मवाद स्विकारला.त्यामुळे देश आसेतु हिमाचल अखंड राहिला.गांधी विचारांनी आम्हीही बदललो.देशाची अखंडता आणि एकता अहिंसेच्या आणि सेवेच्या मार्गाने कायम राहिल यावर आमची श्रद्धा बसली.आजही ती कायम आहे.भारत जोडो चळवळीचा प्रभाव आजही टिकुन आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हटले की आमच्यात तारुण्य सळसळते. भारत जोडो चळवळीने आम्हाला दिलेली ती बक्षीसी आहे असे आम्ही मानतो.
आज कधी नव्हे ईतकी भारत जोडो या चळवळीची आवश्यकता आहे.देश दुभंगत चाललेला आहे असे आम्ही पाहत आहोत.नेहरुजी म्हणायचे देश कंपार्टमेंटमध्ये विभागलेला आहे.युपीवाला,महाराष्ट्रीयन,बेंगाली,तामिली,कन्नडी,गुज्जु,मल्ल्याली यांच्यामध्ये देश विभागलेला आहे.आज तर त्याहीपेक्षा भयंकर वातावरण आहे.आज देश हिंदु-मुसलमान,दलीत-सवर्ण,ब्राह्मण-ब्राह्मणेतर,कट्टर धर्माभिमानी ते पुर्ण नास्तिक असा उभाआडवा दुभंगलेला आहे.हे दुभंगणे अतिशय धोक्याचे आहे.विभागणे आणि दुभंगणे यामध्ये कमालीचे अंतर आहे.विभागलेली मने जोडली जाऊ शकतात. दुभंगलेली मने सर्वनाशाशिवाय काहीही शिल्लक ठेवीत नाहीत.ईतिहासमध्ये त्याचे असंख्य पुरावे आहेत.मुसलमान वंदे मातरम बोलत नाहीत म्हणजे ते देशद्रोही आहेत असा समज असणार्यांची संख्या वाढत चालली आहे.देशात वीस कोटी लोक मुसलमान आहेत.या सगळ्यांना देशद्रोही समजणे मुर्खपणा आहे.एवढ्या प्रचंड संख्येने देशात देशद्रोही असतील तर तो देश अखंड राहु शकत नाही ईतकी समज असु नये काय?मुसलमानांना सापत्नपणाची वागणुक देणे देशाला महाग पडेल.
मी वाँट्स अप वरील पोष्टींग्ज पाहत असतो.बंधुभाव आणि आदरभाव याचा मला तेथे अनेकदा अभाव आढळतो.या देशाला गांधी-नेहरुंनी नाही तर नथुराम गोडसेने स्वातंत्र्य मिळवुन दिले ईथपर्यंत गांधी-नेहरुंचा अपमान करणाऱ्या पोष्ट्स आणि त्यातील नथुरामाचे गायलेले गोडवे वाचल्यावर हसावे की रडावे हा प्रश्न पडतो.गांधी-नेहरुंच्या दहा दहा वर्षे तुरुंगामध्ये जाऊन राहण्याला काहीच किंमत नाही का?जे राष्ट्र राष्ट्रपुरुषांना विसरते,त्यांची हेटाळणी करते ते राष्ट्र टिकत नाही.जगात कोठेही राष्ट्रपुरुषांविषयी अनादराने बोलत नाहीत.राष्ट्रपुरुषांबाबत अनादराने बोलणे महापाप समजले जाते.आपल्या आईवडीलांचा धिक्कार करण्यासारखे ते समजले जाते.आपल्या देशात राष्ट्रपुरुषांबद्धल अनादराने बोलणार्यांनी यातुन बोध घ्यावा.राष्ट्रपुरुषाबद्धल कमालीचा आदर आणि भक्तीभाव देश जोडुन ठेवतो.
भारतीय संविधानाचा आदर राखणे गेल्या काही वर्षापासुन ढळत चालले आहे.संविधानाचा सन्मान करणे भारत जोडोचा खरा कणा आहे.भारतीय जनतेच्या एकतेचे,बंधुभावाचे आणि अखंडतेचे त्यात दर्शन होते.पण सद्या त्यातील प्रतिज्ञाही कोणी गंभीरपणे घेत नाही.संविधानातील अनेक तरतुदी देशांतील विविध भागांचा,माणसांचा आणि परंपरांचा विचार करुन निर्माण केल्या आहेत.त्यापैकी आरक्षण ही एक तरतुद आहे.मागासवर्गीय आणि ईतरमागासवर्गीयांना सन्मानाने जगण्याची त्यात संधी आहे.त्या संधीचा उपभोग घेण्याचा त्यांना संविधानाने हक्क दिला आहे.लाखो रुपये मोजुन बनलेले डॉक्टर,ईंजिनियर आणि तंत्रज्ञ आपल्याला चालतात.त्यांनी मोठी मोठी पदे भुषवलेली आपल्याला चालतात.पण मागासवर्गीयांनी आरक्षणाच्या जोरावर स्वत:ची प्रगती केलेली आपल्याला चालत नाही.त्यामुळे देशाची वाट लागलेली आहे असे आपण सहज म्हणतो. शेकडो वर्षे आपल्यावर परक्यांचे राज्य होते. त्या अपमानीत परिस्थितीला कोण जबाबदार होते हे याचे उत्तर आपण देत नाही.त्यावेळी मागासवर्गीय निश्चित देशाचे नेत्त्रुत्व करीत नव्हते. आपण गुलामगिरीत कुणाच्या नाकर्तेपणामुळे गेलो होतो?
देश जोडण्यासाठी आपल्याला आता नवीन मार्ग चोखाळावे लागतील.धर्माधारित राष्ट्र ही संकल्पना कधीही यशस्वी होऊ शकत नाही.तसे असते तर आजचे बलाढ्य राष्ट्र अमेरिका अजुनही ईंग्लंडचे एक अंग असते.एकाच कुराणाला मानणारे विविध मुस्लिम देश तयार झाले नसते.नेपाळनेही हिंदुराष्ट्र ही ओळख सोडली नसती.जिथे समानता आहे,जिथे सेवाभाव आहे,जिथे प्रत्येकाच्या चेहर्यावर सुरक्षिततेचा भाव आहे,पोटाची खळगी भरली जाईल याची जिथे खात्री आहे,वैज्ञानिक द्रुष्टीकोन आहे,न्यायाची बुज आहे,आपपसात आदराची भावना आहे तेथे देश जोडला जातो.भारत जोडोला या सगळ्या गुणांची आवश्यकता आहे. नेपाळने आपल्या लाडक्या पंतप्रधानांची वाचा बंद केलेली आहे. ती खुली करण्यासाठी भारत जोडो चळवळीची फार गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *