

वसई(प्रतिनिधी)-भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सध्या रिलायन्स जिओ द्वारा सुरू आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत,असे असतानाही
रिलायन्स जिओने पालिकेचे आदेश धाब्यावर
बसवून दिवसाही काम सुरूच ठेवले आहे.दुसरीकडे रिलायन्स जिओला
कार्यकारी अभियंता राजेंद्र लाडचे अभय मिळत असल्याची चर्चा वसईत सुरू आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार मनपाच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्या आशीर्वादानेच रिलायन्स जिओद्वारा मनमानी पद्धतीने दिवस रात्र काम सुरु असल्याची माहिती पुढे येत आहे.
वसईत ठिकठिकाणी रिलायन्स जिओद्वारा भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. वसई विरार मनपाच्या बांधकाम विभागाने अनेक अटी व शर्ती च्या अनुषंगाने अधीन राहून सदरचे काम करण्याची परवानगी दिली होती. पण रिलायन्स जिओकडून पालिकेच्या अटी – शर्तींचा भंग करून काम करताना दिसत पहावयास मिळत आहे. पालिका व रिलायन्स जिओ मध्ये झालेल्या कारारनाम्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सदर काम करण्याची अनुमती देण्यात आली आहे. परंतु रिलायन्स जिओ भरदिवसा केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना मात्र विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एकीकडे डोळ्यादेखत रिलायन्स जिओ कडून नियमांचे उल्लंघन होत असताना पालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक सदर प्रकारा कडे कानाडोळा करताना दिसत आहेत.शिवाय पालिकेच्या संबंधित प्रभागाच्या अभियंत्याच्या देखरेखीखाली सदरचे काम होणे आवश्यक होते, पण सध्या मनमानी पणे सुरू असलेल्या रिलायन्स जिओच्या कामा बाबत पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
एकप्रकारे कारारनाम्यातील तरतुदी नुसार अटी – शर्तींचा भंग केल्या रिलायन्स जिओवर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित असताना पालिकेकडून कोणत्याच स्वरूपाची कारवाई न झाल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सदर प्रकाबाबत पालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांच्या कडे विषद केले असता त्यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्या कडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने रिलायन्स जिओ वर कारवाई कोण करणार असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.शिवाय हे काम करताना वाहतूक विभागाकडूनही परवानगी न घेतल्याने अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण?हा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.दरम्यान रिलायन्स जिओबाबत पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर काम बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रिलायन्स जिओ सोपस्कार म्हणून काही वेळ काम बंद केले खरे, पण बंद केलेले काम पुन्हा चालू करून एकप्रकारे पालिकेच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली आहे.दुसरीकडे याबाबत आयुक्त बी.जी.पवार यांच्याकडेही तक्रार केल्यावर त्यांनी सदर प्रकाराबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.