कोरोना वायरसने सर्वत्र थैमान घातलेला असून तो रोखण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून पर्यायाने कॉरन्टाईन रूग्णांची संख्याही कईक पटीने वाढलेली आहे.

एखाद्या रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळल्यास त्याच्या कुटूंबास किंवा त्यांच्या संपर्कातील सर्वांची अलगीकरण (क्वारंन्टाईन) प्रक्रीया करण्यात येते. याकामी महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) तयार करण्यात आलेले असून त्यांना जेवण, पाणी व इतर आवश्यक सुविधा देण्यात येतात. परंतु महानगरपालिकेमार्फत सदर रूग्णांकडून जेवणासाठी प्रति माणशी, प्रति दिन रू.२५०/- शुल्क आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

लॉकडाऊनमुळे रोजगार, उद्योगधंदे ठप्प झालेले असल्याने सर्वच स्तरातील जनतेची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावलेली आहे. लॉकडाऊन कालावधीची अनिश्चितता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक खर्चाचे गणित पुर्णत: फिस्कटलेले आहे.
कोरोनामुळे उद्भलेल्या अशा भयानक गंभीर परिस्थितीमध्ये क्वारंन्टाईन रूग्णांकडून त्यांच्या जेवणासाठी शुल्क घेणे चुकीचे असल्याचे मत जनमाणसात व्यक्त होत आहे. कोरोना आणीबाणीमुळे नागरीकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीकोनातून क्वारंन्टाईन रूग्णांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येवू नये, असे स्पष्ट मत सभापती कन्हैया (बेटा) भोईर यांनी व्यक्त करत मनपा प्रशासनास लेखी निवेदन दिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *