

वसई(प्रतिनिधी)-वीस कामगारांना पोलीस बळाचा वापर करून कंपनीतून काढून टाकण्याचे षडयंत्र रचणारे वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सध्या त्यांच्या दबंगखोर भूमिकेमुळे भलतेच वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते, मात्र पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी कायद्याचा गळा घोटून कंपनीत घुसून वीस कामगारांना कंपनीतून काढून टाकण्याचा कर्मदरिद्रीपणा दाखवला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार कायदा आहे. कामगारांचा विषय हा एखाद्या कामगार संघटनेच्या परिकक्षात येत असेल तर कामगारांना विश्वासात घेऊन त्यांच्या न्याय-हक्कासाठी लढण्याचे काम कामगार संघटना करते. असे असताना कंपनीत घुसून कामगारांना दमदाटी आणि घाणेरड्या भाषेत शिवीगाळी करून त्यांना कामावरून काढून टाकण्याचा अधिकार विलास चौगुले यांना कोणी दिला? हा सवाल आता उपस्थित होत आहे.
२० कामगार त्यांच्या हक्कासाठी कंपनी व्यवस्थापनाबरोबर कायदेशीर मार्गाने भांडत होते. मात्र त्यांचा आवाज शासनाने दिलेल्या अधिकारांखाली पार दाबून टाकण्याचा प्रयत्न विलास चौगुले आणि त्यांच्या चार साथीदारांनी केला आहे. केवळ नी केवळ विलास चौगुले यांच्या दलभद्री आणि अन्याय्य वागणुकीमुळे २० कामगारांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. हातावर कमावून आपला प्रपंच चालवणारे २० कामगार विलास चौगुले आणि त्यांच्या चार साथीदारांमुळे रस्त्यावर आले आहेत. कंपनीतून सदर कामगारांना हाकलून देण्याईतपत कंपनीमालकाची मजल गेली ती केवळ पोलीस निरीक्षक विलास चौगुले आणि त्यांच्या चार साथीदारांमुळे. हा केवळ त्या २० कामगारांवर झालेला अन्याय नसून कामगार कायदा आणि एकूणच कायदा-सुव्यवस्थेचा घोर अपमान आहे. यावर आता मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षकांनी एकत्रितपणे कारवाई करून मुजोर पोलीस निरीक्षक विलास चौगुले, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस कर्मचारी सचिन दोरकर आणि अन्य एक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांना कठोर कारवाई करून निलंबित करण्यात यावे. येत्या काही दिवसांत ही कारवाई झाली नाही तर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा कामगार नेते मारूती झुंजूरके आणि २० कामगारांनी दिला आहे.
मागील काही महिन्यांपासून पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी कायदा धाब्यावर बसवणार्या अनेक गुन्हेगारांना तुरूंगाची हवा खायला लावलीय. मग त्यात अवैध गैरधंदे असोत किंवा स्वत: कायदा धाब्यावर बसवणारे पोलीस असोत. अत्यंत प्रामाणिक आणि सचोटीनं वागून पालघरकरांना कायद्याबद्दल आदर वाटेल असे काम गौरव सिंग यांनी अल्पावधीत करून दाखवले आहे. नागरिकांना कायद्यातील पारदर्शीपणा ठळकपणे दिसून लागला असताना अगदी काही दिवसांपुर्वी वालीव औद्योगिक वसाहतीतील २० कामगारांना कंपनीत जाऊन धमकावणार्या दबंगखोर पोलीस निरीक्षक विलास चौगुले आणि त्यांचे साथीदार विजय चव्हाण, सचिन दोरकर आणि अन्य दोन पोलीस यांनी कायदा धाब्यावर बसविण्याचा प्रताप केला. या पोलिसांवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून २० कामगार आणि कामगार नेते मारूती झुंजूरके यांनी मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक आणि त्याखालोखाल कनिष्ठ पातळीवर तक्रार अर्ज सादर केले आहेत. अद्याप या तक्रार अर्जांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसून पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी जातीने सदर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. ते जर कारवाई करण्यास असमर्थ ठरत असतील तर त्यांनी मेहनतीने उभ्या केलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास उडून जाईल. कायदा हा सर्वांसाठी समान असतो मग तो सामान्य नागरिक असो किंवा स्वत: पोलीस. गौरव सिंग यांनी त्यादृष्टीने पावले उचलून कायद्याची आब राखावी आणि गुन्हेगारांना शासन करावे अशी अपेक्षा
मारूती झुंजूरके यांनी व्यक्त केली.
वालीवमधील श्रीकृष्णा फेब्रिकेटर्स प्रा.लि. या कंपनीत २० कामगार काम करतात. या कामगारांचे आर्थिक शोषण करण्याबरोबरच त्यांना कायमस्वरूपी तत्वावरून थेट कंत्राटी तत्वावर काम करण्यास भाग पाडले म्हणून कामगार कायद्याचा आधार घेत स्थानिक संघर्ष कामगार संघटनेने त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु कंपनीमालक किशोर गणत्रा व रवी गणत्रा यांनी पैशाच्या माजापुढे पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांना कायदा वाकवण्यास भाग पाडले. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. यात अनेक कायदेशीर बाबी अंतभूर्त आहेत. परंतु जेव्हा घटना आणि कायदाविरोधी कृत्य केले जाते तेव्हा ते लोकशाहीविरोधात जाते. पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी अधिकारांचा गैरवापर करून दाखवलेल्या गुंडगिरीचं कोणीही कधीच समर्थन करणार नाही. २० कामगारांना भिती दाखवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस कर्मचारी सचिन दोरकर आणि अन्य दोन पोलिसांनी कंपनीत घुसून कामगारांना हाकलून देण्याचा केलेला प्रकार सदरक्षणाय; खलनिग्रहणाय या ब्रिदवाक्याला लाज आणणारा आहे. सदर पोलिसांना कायद्याची आब राखता येत नसेल तर अशा अधिकार्यांना कायद्याचा खरा अर्थ समजावून देण्याबरोबरच त्याचा धाक दाखवून देण्याचे कर्तव्य पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना पार पाडावे लागणारच. २० कामगारांना रस्त्यावर आणून त्यांचं भविष्य देशोधडीला लावू पाहणार्या पाचही पोलिसांवर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा येत्या २५ मे रोजी आमरण उपोषणाचे हत्यार उपसून लोकशाही मार्गाने पोलिसांचा धिक्कार केला जाईल असा इशारा कामगार नेते मारूती झुंजूरके यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
नेमके प्रकरण काय?-
वालीव औद्योगिक वसाहतीत श्रीकृष्णा फेबिक्रेटर्स प्रा.लि. ही कंपनी आहे. या कंपनीत रमाकांत जैतापकर, समरनाथ जैसवार, छोटेलाल जयस्वार, रामधनी कनोजिया रामआसरे जयस्वार, संजय जयस्वार, रमेश जयस्वार, नरेंद्र म्हात्रे, अशोक जयस्वार, दयानंद जयस्वार, मोहनप्रसाद, महेंद्र जयस्वार, रमेश मौर्या, दयाशंकर गिरी, महेश दुब, सुर्याप्रसाद पाईकराय, विजयकुमार मौर्या, रमेशचंद्र रूबईराम जयस्वार, महाबल रामधनी यादव आणि सुभाष जैस्वार हे कामगार विविध हुद्द्यांवर मागील काही वर्षांपासून कायमस्वरूपी तत्वावर काम करत आहेत. मध्यंतरी कंपनीमालक किशोर गणत्रा, त्याचा मुलगा रवी गणत्रा यांनी सदर कामगारांना कोणतीही रितसर नोटीस न देता कामयस्वरूपी तत्वावरून थेट कंत्राटी तत्वावर काम करण्यास भाग पाडले. याविरोधात कामगारांनी स्थानिक संघर्ष कामगार संघटनेशी संपर्क साधून नंतर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. कामगार संघटनेच्या विधायक लढ्यानंतर कंपनीमालकांनी कामगारांना त्यांचा कामगार भत्ता आणि कामगार कायद्यानुसार जो काही त्यांचा मागील वर्षातील मोबदला होता तो देण्याचे कबूल केले. मात्र अनेकदा चर्चा होऊनही मोबदला देण्यास कंपनीमालकांनी नकारघंटा वाजवली. अखेरकार कामगार संघटनेला भिती घालण्यासाठी कंपनीमालक रवी गणत्रा याने वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्याशी संधान साधून पत्रकार कैलास रांगणेकर आणि मारूती झुंजूरके यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कामगारांनी त्यांच्या स्वचेछेने काम सोडले आहे. असे रवी गणत्रा, किशोर गणत्रा यांनी भासवण्याचा प्रयत्न केला, परंतु कामगारांनी त्यांच्या स्वेच्छेने काम सोडलेच नव्हते तर गुरूवारी (दि.9 मे) विलास चौगुले यांनी त्यांचे साथीदार पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस कर्मचारी सचिन दोरकर, अन्य एक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांनी कंपनीमालकाच्या सांगण्यावरून कंपनीत जाऊन २० कामगारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळी करून त्यांना कंपनीतून अक्षरश: हाकलून दिले. यावेळी विजय चव्हाण, सचिन दोरकर आणि अन्य दोन पोलिसांनी जणू आपण बापच आहोत अशा गुर्मीत कामगारांना अपमानास्पद वागणूक देऊन कामावरून काढून टाकले. या प्रकाराला कंपनीमालक किशोर गणत्रा, रवी गणत्रा यांची फूस होती. कामगारांना अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळी करणे आणि थेट कंपनीत घुसून कामगारांना कामावरून निघून जा असे सांगण्याचा अधिकार विलास चौगुले, विजय चव्हाण, सचिन दोरकर आणि अन्य दोन पोलिसांना कोणी दिला. अक्कल आणि संवेदना गहाल टाकलेल्या या पाचही निर्लज्ज पोलीसांना कायद्याचा धाक पोलीस अधीक्षकांनी दाखवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.