

विरार : वसई-विरार शहरातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती; मात्र कोरोनाविरोधातील लढाई वसई-विरार महानगर पालिका सक्षमपणे लढत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली आहे.
वसई-विरार महापालिकेकडून वसईतील वरुण इंडस्ट्री येथे ‘कोरोना हेल्थ केअर सेंटर’ बनवण्यात येत आहे. या सेंटरमध्ये एक हजार रुग्ण क्षमतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर वसईतील जी. जी. कॉलेजमधील ‘कोरोना हेल्थ केअर सेंटर’मध्ये सातशे रुग्ण क्षमता असून; हे सेंटर दोन दिवसांपासून कार्यरत झाले आहे.
इतक्या क्षमतेच्या ‘हेल्थ केअर सेंटर’साठी लागणाऱ्या डॉक्टर आणि अन्य कर्मचारी वर्गाची भरती प्रक्रिया महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. या संदर्भातील माहिती महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पैकी १२ एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टर आधीच नियुक्त करण्यात आलेले आहेत. ही भरती प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे. तर अन्य स्टाफ रोटेशनप्रमाणे गरजेच्या ठिकाणी नियुक्त केला जात आहे. वॉर्डबॉय, आया यांची संख्यादेखील सोयीनुसार ठेकेदारामार्फ़त भरली जाते, अशी माहिती मनाळे यांनी दिली.
वसई-विरार महापालिकेकडे सद्यस्थितीत ९० बीएएमएस, १९ एमबीबीएस, २२ विविध विषयांतील तज्ञ फिजिशियन, १२० एएनएम आणि २०० नर्स असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली.
याशिवाय ४६६ सफाई कामगारांनाही कोरोनासंदर्भातील आवश्यक कामी घेतले जात असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान; वसई-विरार महापालिकेतील कोरोना रुग्णाचा वाढता आकड़ा हा मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संक्रमणातून वाढत असल्याचे निदर्शनास आले असले तरी मुंबई महापालिकेसमोरील अडचणीही मनाळे यांनी या वेळी अधोरेखित केल्या.
आजूबाजूच्या परिसरातून मुंबई महापालिकेत अंदाज़े ७० ते ८० हजार कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येच्या राहण्याची सोय करणे मुंबई महापालिकेला शक्य होईल, असे वाटत नाही, अशी शक्यता रमेश मनाळे यांनी व्यक्त केली.
मात्र वसई-विरार महापालिका क्षेत्रातून मुंबईत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे। कौन्सिलिंग महापालिकेकडून करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
वसई-विरारमधून ५६ बस मुंबईत जातात. त्यांच्या २१५ फेऱ्यांतून अंदाजे २८०० कर्मचारी प्रवास करतात. या अत्यावश्यक सेवतील कर्मचाऱ्यांना सकाळी ६.३० व संध्याकाळी ४.३० वाजता कोरोनाबाबत घ्यायच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले जाते. यासाठी वसई-विरार महापालिकेने खास मार्गदर्शक पुस्तिका छापली असून; तिचे वितरणदेखील या वेळी केले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान; राज्य सरकारकडून वेळोवेळी येणाऱ्या निर्देशांचीही अंमलबजावणी महापालिकेकडून केली जात असल्याचे ते म्हणाले. यात कोरोना हेल्थ केअर सेंटरची क्षमता वाढवणे, डिस्चार्जचा १४ दिवसांचा कालावधी १० दिवसांवर आणणे अशा मार्गदर्शक सूचना असून; त्यांचा अवलंब पालिका करत असल्याचे मनाळे म्हणाले.
कोरोनाचे सावट पुढील काही महिने असेच राहणार असून; यापुढे आपल्याला कोरोनासोबत राहण्याची सवय करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाला आवश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घ्यावी, असे आवाहन सरतेशेवेटी अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी वसई-विरारकर जनतेला केले आहे.