
विरार : वसई-विरार आणि परिसरातील शेकडो परप्रांतीय मजूर गावी जाण्याच्या प्रतिक्षेत वसई-सनसिटी रोड येथील १०० फिट रोड येथे खोळंबले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या मज़ुरांना वसई येथून परराज्यांत गाडया जाणार असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधिंकडून मिळाल्याने या ठिकाणी शेकडो लोक मागील तीन दिवसांपासून खोळंबले आहेत.
या सगळ्यांनी निवाऱ्यासाठी आजूबाजूच्या इमारतींचा आसरा घेतला आहे. यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था आजूबाजूच्या इमारतींतील रहिवाशांकडून होत असली तरी; सरकार किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे या लोकांचे म्हणणें आहे.
वसईवरुन परराज्यात गाड्या सूटणार किंवा नाही, याबाबतही त्यांना अद्याप कुठूनही ठोस माहिती मिळत नसल्याने हे लोकांची चिंता वाढली आहे. या साटमारीत महिला आणि मुलांचे प्रचंड आबाळ होत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवस या लोकांचे शौच आणि अन्य विधी याच ठिकाणी होत असल्याने परिसरातील नागरिकांसह या लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या लोकांच्या परतीची सोय लवकरात लवकर सरकारने करावी व त्यांचे हाल थांबवावेत, अशी मागणी वसईकर जनतेने केली आहे.