
सद्या भारताचे आणि चीनचे संबंध बिघडलेले आहेत.चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांनी थेट युद्धाची भाषा केलेली आहे.लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर खडाखडी चालु आहे.चीनने नियंत्रण रेषवरुन वाद उकरुन काढला आहे.चीनी राजकारणाचे जाणकार असणार्यांना यामध्ये चीनच्या मुत्सद्दीपणाचा प्रत्यय येत आहे.कोरोनावरुन अमेरिकेने आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनी चीनला घेरण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.त्यातुन बाहेर पडण्यासाठी चीनने हाँगकाँग आणि लडाख मध्ये सैनिकी कारवाई चालविलेली आहे.याला कुटनिती म्हणतात.या कुटनितीतुन बरेच काही शिकता येते.एखादा मुद्दा वादग्रस्त बनला की त्यातुन कसे बाहेर पडायचे हा राष्ट्रासमोरील गहन प्रश्न असतो. मुळ मुद्याला बगल द्यावी लागते.भलताच मुद्दा ऐरणीवर आणावा लागतो.त्यातुन मुळ मुद्दा बाजुला पडतो.जगाचे लक्ष नवीन मुद्यावर केंद्रित होते.हळुहळु नवीन मुद्दा वादाचे केंद्रस्थान बनतो.चीनची ही कुटनिती आहे.त्यात चीन यशस्वी होताना दिसतो.कोरोनाचा विषाणु कसा निर्माण झाला यावरील वादविवाद आता मागे पडला आहे.नाहीतर ज्या चीनला डोनाल्ड ट्रंप धडा शिकवायला जाणार होते त्यांनी भारत चीन विवादामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली नसती.
या तणावाच्या वातावरणात मला डॉ.द्वारकानाथ कोटणीसांची प्रकर्षाने आठवण होते.बहुतेकांना डॉ.कोटणीस कोण हे माहिती नसावे.आपल्याकडे त्यांचे क्वचित स्मरण केले जाते. ज्यावेळी चीनी राष्ट्राध्यक्ष भारताच्या भेटीवर येतात तेव्हा भारतीय पत्रकारांना डॉ.कोटणीसांची आठवण होते.त्यावेळी दोन चार लेख डॉ.कोटणीसांवर लिहिले जातात. डॉ.कोटणीसची जादु सदासर्वदा चीनवर वापरली तर भारत आणि चीनमध्ये कधी वैराची भावना राहाणार नाही. चीनच्या जनतेवर डॉ.कोटणीसांचे गारुड आहे.डॉ.कोटणीसांचा देश म्हणुन कधीही चीन भारतावर आक्रमण करण्यास धजावला नसता.पण भारताने कधीही डॉ. कोटणीसांचा वजीर वापरला नाही.भारताने ही संधी वारोंवार गमावलेली आहे.डॉ.कोटणीसांना चीनी जनतेत सर्वोच्च सन्मान आहे. ज्या ज्या वेळी चीनी राष्ट्राध्यक्ष भारतात येतात त्या त्या वेळी डॉ.कोटणीसांचा सन्मान करण्याची एकही संधी ते गमावत नाहीत.डॉ.कोटणीसांच्या कुणा ना कुणा नातेवाईकांना ते हमखास आपल्याकडे बोलावुन घेतात आणि त्यांचा बहुमान करतात.असे कोण आहेत हे डॉ.द्वारकानाथ कोटणीस?प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरुन येईल असे डॉ.कोटणीसांचे व्यक्तीमत्व होते.
मुंबईच्या जी.एस. मेडीकल काँलेजमधुन डॉक्टरी मिळविलेले डॉ.कोटणीस मुळचे आपल्या सोलापुरचे.१९१०मध्ये त्यांचा जन्म झालेला होता.डॉ.कोटणीस ऐन तारुण्यात असताना चीनमध्ये युद्धाची धुमश्चक्री चालु होती.जपानने चीनवर आक्रमण केलेले होते.मोठ्या प्रमाणात चीनी सैनिक जखमी होत होते.भारताचा स्वातंत्र्य लढा देखील प्रखर झाला होता.त्यावेळी चीनचे जनरल झु दे यांनी भारताकडे वैद्यकीय मदतीची याचना केली.ईथे पंडीत जवाहरलाल नेहरु पटलावर येतात.जनरल झु दे यांनी नेहरुंकडे मदत मागितली.नेहरूंनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला.त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते.दोघांनी तातडीने निर्णय घेतला.चीनकडे त्यांनी पाच डॉक्टरांचे पथक पाठविले.या पथकामध्ये २८ वर्षांचे डॉ.कोटणीस होते.नेहरुंचे आंतरराष्ट्रीय नेतृत्व ज्यांना मान्य नाही त्यांनी यातुन काहीतरी शिकावे.देश पारतंत्र्यात असताना देखील ज्यांच्या शब्दांना जगभर मान होता त्यापैकी जवाहरलाल नेहरु एक होते.
डॉ.कोटणीसांचे आणि त्यांच्या पथकाचे ज्यांनी स्वागत केले त्यामध्ये खुद्द माओ त्से तुंग होते.माओंनी आणि जनरल झु दे यांनी पथकाला जबाबदारीची कल्पना दिली.आघाडीवर राहुन जखमी सैनिकांना ताबडतोब ईलाज करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.डॉक्टरांच्या पथकाने ही जबाबदारी आनंदाने स्विकारली.आज कोरोनामुळे जो प्रांत जगभर गाजतो आहे त्या वुहानमध्ये या पथकाने कार्यास सुरवात केली.डॉ.कोटणीसांनी नंतर त्यांच्या कुटुंबियासमवेत जो पत्रव्यवहार केला त्यामध्ये त्यांनी आनंदाने स्विकारलेल्या या जबाबदारीचा प्रत्यय येतो.डॉक्टरांची आई फार घाबरत असे.आघाडीवर जीवाशी खेळ असतो.त्यामुळे आई चिंतेत असे.पण डॉक्टर पत्रातुन नेहमी आघाडीवरील गमतीजमती रंगवुन सांगत.आईची त्यांना केव्हढी काळजी असे याचे हे उदाहरण आहे.
याच काळजीने पुढे चीनच्या सैनिकांची ह्रदये जिंकुन घेतली.डॉ.कोटणीसांनी जखमी सैनिकांची अहोरात्र सेवा केली.सैनिकांवर औषधोपचार करता करता त्यांना धीर देण्याचे कामही डॉक्टरांनी केले.आजुबाजुची परिस्थिती उपासमारीची.त्यात विविध रोगांचे थैमान.कधीही म्रुत्यु येईल अशी घनघोर लढाई.त्याही परिस्थितीमध्ये डॉ.कोटणीसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असंख्य जीव वाचवले.त्यांना अवघे ३२ वर्षांचे आयुष्य लाभले.म्हणजे चीनमध्ये त्यांना उणेपुरे चार वर्षांचे आयुष्य लाभले.पण या चार वर्षांत त्यांनी चीनी सैनिकांची जी सेवा केली त्यांचे फळ त्यांना दिगंत किर्ती देऊन गेले.चार वर्षांच्या अथक मेहनतीचा त्यांच्या प्रक्रुतीवर गंभीर परिणाम झाला.मोठ्या आजारात ते सापडले.१९४२ साली त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनासमई माओ त्से तुंग यांनी जे शब्द उच्चारले ते पहा.माओ म्हणतात
The army has lost a helping hand.
The nation has lost a friend.
Let us always bear in mind his international spirit.
कोणत्याही माणसाचा यापेक्षा अधिक गौरव होऊ शकत नाही.एका महान देशाचे मित्र म्हणुन झालेला गौरव हा आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचे चिन्ह असायला हवे. डॉ.कोटणीसांचा माओनी पुढे जाऊन जो गौरव केलेला आहे त्यामुळे आपली छाती गर्वाने फुलुन गेली पाहिजे.डॉक्टरांच्या जागतिक मानवतावादी कार्याची माओंनी विनम्रपणे कबुली दिली आहे.
आज डॉ.कोटणीस आठवण्याचे कारण सद्या भारत आणि चीन यांच्यामध्ये निर्माण झालेली दरी होय.एकमेकाचे शत्रु म्हणुन भारत चीन एकमेकासमोर उभे ठाकलेले आहेत. प्रत्यक्षात भारत आणि चीनमध्ये एव्हढे वैमनस्य असण्याची गरज आहे का?ऐतिहासीक संदर्भ तपासले तर चीन भारताचा कधी शत्रु असल्याचे उदाहरण नाही.उलट हजारो वर्षे त्यांच्यात सौजन्याचे संबंध होते.भारताने चीनला बुद्ध दिला.चीनच्या हुआन त्संगने सम्राट हर्षवर्धनाच्या काळातील भारतीयांच्या सम्रुद्धीविषयी विस्ताराने लिहिले नसते तर भारतात कधी काळी सोन्याचा धुर निघत होता हे आपल्याला खरे वाटले नसते.डॉ.कोटणीसांच्या उदाहरणावरुन हेही स्पष्ट होते की अगदी अलीकडे आपले चीनशी मजबुत संबंध होते.माओच्या अगोदर चीनमध्ये चँग कै शेक यांची राजवट होती.या राजवटीत नेहरुंचा जेव्हा चीन दौरा झाला तेव्हा त्यांचे न भुतो न भविष्यती असे स्वागत झालेले होते.अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि चीन यांच्या मध्ये घनिष्ठ संबंध होते.हिंदी चीनी भाईभाईचा ललकारा आसमंतात गुंजत होता.दोन्ही देश नुकतेच स्वतंत्र झाले होते.दोघानाही वैज्ञानिक द्रुष्टीकोन असलेले देश घडवायचे होते.दोघांचीही घोडदौड चालु होती.१९५९पर्यंत भारताचा विकास दर जगात सर्वात जास्त होता.आंतरराष्ट्रीय नेतृत्व म्हणुन नेहरुंचा लौकिक चालु होता.इंग्रजांच्या काळातही कधी न पाहिलेली प्रगती भारत अनुभवत होता.त्याकाळचे चित्रपट त्याची साक्ष आहेत.बलवान भारत घडवायचा म्हणुन सगळे जिद्दीला पेटले होते.हिंदु ,मुस्लिम,सिख,ईसाई भाईभाई होते. जर १९५९ च्या अगोदर नेहरुंचा म्रुत्यु झाला असता तर जगातील सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी म्हणुन जगाने त्यांची नोंद करुन ठेवली असती.पण भारताच्या दुर्दैवाने तिबेटचे प्रकरण घडले.पंडित नेहरु हे कमालीचे लोकशाहीवादी होते.त्यांनी मोठ्या उदार अंत:करणाने दलाई लामांना भारतात आश्रय दिला.तिथे चीन दुखावला.पुढे भारत चीन युद्धही छेडले गेले.त्यानंतरचा ईतिहास सर्वाना ठाऊक आहे.लागोपाठ पाकिस्तानबरोबर युद्ध झाले.त्या युद्धांच्या तीव्र झळा भारताला झेलाव्या लागल्या.त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम आपल्याला भोगावे लागले.भारताची आंतरराष्ट्रीय पत घसरली.भारतात कम्युनिस्ट चळवळ बदनाम झाली.कामगारांच्या वाताहतीला तेथुन सुरवात झाली.जर नेहरुंनी दलाई लामांना भारतात आश्रय दिला नसता तर आजचा भारत वेगळा असता.रशिया चीन आणि भारताचा दबदबा सार्या जगात असता.पुढे दलाई लामा नेहरुंना विसरले.
नव्वदीच्या दशकात ग्लोबलायझेशनचा दौर चालु झाला.राजीव गांधींनी त्याअगोदर संगणकाचे विश्व भारताला खुले केले होते.त्यामुळे भारताची पुन्हा गगनभरारी चालु झाली.युद्धापासुन भारत चार हात दुर राहिल्याने भारतातील गरीबी हटु लागली.भारताचे चीनबरोबरील संबंध पुन्हा सुधारले. त्याचा लाभ भारतीयांनी घ्यायला हवा होता.मी मागे बेजिंगमध्ये होतो. हजारो भारतीय प्रवासी मी तिथे पाहिले.भारतीय लोकांबद्दलचे चीनी लोकाचे ममत्व पाहिले.आमचा गाईड मायकल चँग याने मनापासुन आमची सेवा केली.पण भारतीय लोकांना अमेरिकेचे अनाकलनीय आकर्षण आहे.अमेरिका खोकला तरीही भारतीयांना त्यातुन संगीत ऐकु येते.भारताला हे परवडण्यासारखे नाही.अनेक गोष्टींसाठी भारताला शेजारी देशाबरोबर,विशेषतः मुस्लिम देशांबरोबर अवलंबुन राहणे भाग आहे. जगभरातील मुसलमान अमेरिकेच्या राजकारणाचा तीव्र विरोध करतात.यामुळे भारताला नेहमी तारेवरची कसरत खेळावी लागते. भारताला स्वतःचे असे स्थिर धोरण नाही.भारत नेहमी हो ना हो ना करत असतो.एकाच वेळी त्याला दोन्ही गटांची मर्जी राखावी लागते.त्यामुळे भारताला कुणीही आपले म्हणुन ग्रुहित धरीत नाहीत.भारत त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात एकाकी पडत चालला आहे.अमेरिकेने भारतावर सँक्न्शन लावण्याची धमकी दिली आहे. भारत चीन विवादामध्ये अमेरिकेने नरो वा कुंजरो वा भुमिका घेतलेली आहे.आपण मध्यस्थीची भुमिका निभावु असे ट्रंप म्हणतात.
अशा परिस्थितीमध्ये भारतात जो युद्धज्वर निर्माण करण्याचा प्रयत्न चालु झालेला आहे त्याला कडाडुन विरोध झाला पाहिजे.पाकिस्तानव्याप्त काश्मीर घेऊन राहाण्याची भाषा युद्धज्वर निर्माण करणारी आहे.सद्याच्या जगात कोण कुणाला नमवु शकत नाहीत.एव्हढा मोठा बलाढ्य अमेरिका.पण अफगाणिस्तानच्या तालीबानीसमोर त्याने गुडघे टेकले आहेत.सततच्या युद्धजन्य वातावरणामुळे भारतासमोर भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.भारताने युद्धाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल घातक ठरु शकते.आधीच काश्मीरचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.अजुनही तेथील अशांतता शमली नाही.काश्मिरी लोकांनी घटनेतील दुरुस्ती स्विकारलेली नाही.पुढे मागे त्याचा उपयोग करुन तेथील उग्रवादी ताकदी भारतात अशांतता निर्माण करतील.
अशावेळी सामंजस्य हे एकच अस्त्र भारताला उपयोगी पडु शकते.युद्धाच्या गोष्टी करणे सोपे असते. पण त्यात पहिला बळी सामान्य जनतेचा जातो.आज कोरोनामुळे देश आर्थिक संकटात सापडलेला आहे.युद्धाचा मार्ग देशाला खोल गर्तेत ढकलेल.भारत चीन पाकिस्तान नेपाळ बांगलादेश श्रीलंका आदी देश एकत्र येऊन एक मजबुत फळी त्यांना उभारली तर एका महान शक्तीचा उदय होऊ शकतो.तिथे ईंग्लंड जर्मनी फ्रान्स एकत्र होऊ शकतात तर आपण का एकत्र होऊ नये?दुसर्याच्या ओंजळीने आपण किती काळ पाणी भरायचे?अशावळी डॉ.कोटणीस कुटनिती आपल्याला फार फायद्याची ठरेल.