
मागील 5 दिवस शांततेत कायदा पाळत सुरू असलेले श्रमजीवी संघटनेच्या “हक्काग्रह” हे शांततेत मर्यादित उपस्थितीत सुरू असलेले आंदोलन आता तीव्र झाले आहे. सरकारच्या असंवेदनशील भूमिकेविरोधात आता विवेक पंडित यांनी “अन्नसत्याग्रह” हे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी दिलेले आयुध वापरत घोडबंदर येथे महामार्गावरच पंडित यांनी शेकडो आदिवासींसोबत ठाण मांडले आहे. पंडित यांच्या सोबत श्रमजीवीच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित आणि अध्यक्ष रामभाऊ वारणा या तिघांनी अन्नत्सत्याग्रह सुरू केला आहे.
आदिवासींना तातडीने रेशनकार्ड आणि सरकारने न्यायालयात दिलेल्या हमीपत्राची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे सत्याग्रह संपणार नाही असे पंडित यांनी आंदोलनाच्या सुरुवातीलाच जाहीर केले.
ही निर्णायक लढाई असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार नाही असे यावेळी संघटनेच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित यांनी संगीतले.
लॉकडाऊन काळात आदिवासी कष्टकरी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी श्रमजीवी संघटनेने अथक प्रयत्न केले. देणगी उभारून ठाणे,पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी गरीब 49 हजार कुटुंबाना संघटनने तब्बल सव्वा तीन कोटींची मदत वाटली. यानंतर हे काम सर्वत्र व्हायला हवे आणि ते सरकार शिवाय शक्य नाही यासाठी विवेक पंडित यांनी मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करून आदिवासींच्या वेदना मांडल्या. ” आदिवासी मजूर कोरोना ऐवजी उपासमारीने बळी जाईल” असे त्यावेळी पंडित यांनी सांगितले होते.
त्याला प्रतिसाद नाही म्हणून पंडित यांनी उच्चन्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पंडित यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर सरकारने सादर केलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयाने सरकारच्या सहमतीने हमीपत्र म्हणून दाखल करून घेतले.
या हमीपत्रात पंडित यांच्या मागणीप्रमाणे तातडीने जे वंचित आहेत त्यांना अंत्योदय आणि प्राधान्य असे पात्रतेप्रमाणे रेशनकार्ड देणे, आणि रेशन धान्या सोबत इतर जीवनावश्यक वस्तू देण्याबाबत सरकारने हमी देउनही अंमल केला नाही. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या चार जिल्ह्यात आतापर्यंत 18 हजार पेक्षा जास्त रेशनकार्ड साठीचे अर्ज दाखल केले आहेत, मात्र त्यांपैकी आतापर्यंत फक्त 1200 ते 1500 कार्ड दिले आहेत.
या सर्व परिस्थितीत संघटनेने 144 कलम पाळत सर्व तहसिल कार्यालयात 26 मे पासून 5 दिवस सतत 50 -50 आदिवासी बांधव शारीरिक अंतर राखत एकत्र येऊन आपला हक्क मागितला. हक्काग्रह केला.
मात्र सरकारने मागण्या मान्य करण्याऐवजी शांततेने हक्क मागणाऱ्या आदिवासींवर गुन्हे दाखल केले.
याच पार्श्वभूमीवर आता श्रमजीवी संघटनेने ही लढाई आता निर्णायक टप्प्यात आणली आहे, विवेक पंडित यांच्यासह विद्युल्लता पंडित, रामभाऊ वारणा या स्वतः वयाने 60 वर्षापेक्षा जास्त असलेल्या संघटनेच्या तीन प्रमुख नेत्यांनी घोडबंदर येथे महामार्गावरच ठाण मांडत “अन्नसत्याग्रह”सुरू केला आहे.
आता सर्व मागण्या मान्य होऊन कालबद्ध कार्यक्रम हाती आल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका पंडित यांनी जाहीर केली.
घोडबंदर येथील फाउंटन हॉटेल शेजारी मुख्य आंदोलन ठिकाणी संघटनेचे प्रमुख नेते तर ठाणे, पालघर ,नाशीक आणि रायगड जिल्ह्यातील 19 ठिकाणी असेच “अन्नसत्याग्रह” सुरू असून प्रत्येला तालुक्यात तालुका अध्यक्ष आणि चार ज्येष्ठ पदाधिकारी यांनी अन्नत्याग केला आहे.
शारीरिक अंतर पाळत, तोंडाला मास्क,रुमाल, पदर घेत, आरोग्य विभागाच्या सूचनांचे पूर्ण पालन करत हे सत्याग्रह सुरू आहे, मात्र गर्दीची मर्यादा मोडत आम्ही सविनय कायदे भंग केला असे पंडित यांनी सांगितले.