गेल्या अनेक किल्ला भ्रमंतीनंतर लोकाग्रहास्तव रविवार दिनांक १९ मे २०१९ रोजी  “आमची वसई” समूहाने “वसई दुर्ग भ्रमंती व भुयारी मार्ग दर्शन” हा विनामूल्य कार्यक्रम २८१व्या वसई विजयोत्सवा निमित्त पुन्हा एकदा आयोजित केला. या उपक्रमाचा जनतेने भरपूर लाभ घेत उदंड प्रतिसाद दिला. यावेळी वसईच्या इतिहासाची सविस्तर माहिती तज्ञ मंडळींनी दिली. तसेच किल्ल्यातील विविध वास्तूंमधे जाऊन त्यांची माहिती देण्यात आली.
सर्व वयोगटातील ५००हून अधिक दुर्गप्रेमी , इतिहास- वास्तु अभ्यासक व निसर्गप्रेमी यात सहभागी झाले होते. भ्रमंतीत वसई- विरार मधूनच नव्हे तर वैतरणा, सफाळे, केळवे, पालघर, तारापूर,डहाणू, मुंबई, पनवेल, डोंबिवली, ठाणे, गुजरात इत्यादि ठिकाणाहूनही लोक सहभागी झाले. ७५ वर्षाच्या आजी- आजोबांपासून ४ वर्षापर्यंतच्या चिमुकल्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.
सर्वांनी सकाळी यशवंत बुरुजाखालील 553 फुट लांबीचा भुयारी मार्ग पार करत त्यातल्या रोमांचाचा, गारव्याचा व स्थापत्य कलेचा मनमुराद आनंद लुटला. पुढे सर्वांनी स्मारकात चिमाजी आप्पांना मानवंदना अर्पण केली. तेव्हा जय वज्राई- जय चिमाजी च्या जयघोषाने अवघा वसई दुर्ग दुमदुमला. ऐतिहासिक श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात भगवान परशुरामांद्वारे निर्मित वसईच्या निर्मिती पासून शिलाहार, गौतमीपुत्र, बिंबदेव, नाथाराव भंडारी, पोर्तुगीज, मराठा राज्यकर्त्यांचा इतिहास सगळ्यांना सांगितला गेला. तसेच मराठ्यांच्या  रणनीती- राजनीती चे ही ऐतिहासिक दाखले देण्यात आले.
जलपानानंतर दुर्ग भ्रमंती सुरू झाली त्यात नागेश महातीर्थ, बालेकिल्ला, किल्ल्यातील साखर कारखाना, शिबंदी, मिझरी कॉर्दिया, नगरपालिका, सिनेट हाउस, बाजारपेठ, आश्रम, विविध देवळे , महाविद्यालय, वखार, मठ, विविध आकाराच्या विहिरी, १० बुरुज, चक्री जिना, सागरी व भूई दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, पाण्याची विविध कुंड, स्नानगृह इत्यादि वास्तूंची भेट व त्यांची सविस्तर माहिती सांगण्यात आली. या सर्व कार्यक्रमात ४७५ जण सम्मिलित होते तर आमची वसई टीमच्या ४० स्वयंसेवकांची सुसज्ज टीम मार्गदर्शन व व्यवस्थापनासाठी सज्ज होती.
या अभ्यास भ्रमंतीत आरोग्य व घातपातासंबंधी कोणताही त्रास होऊ नये व सहभागींना यातायातासाठी महानगरपालिका परिवाहन सेवा, आरोग्य विभाग, अग्नीशमन दल, पुरातत्व विभाग व पोलीस दलाने उत्तम व्यवस्था ठेवली होती. उपक्रमास धर्मसभा अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास अभ्यासक वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली. 
सहभागी झालेल्या सर्वानी “आमची वसई” करत असलेल्या विविध स्तुत्य उपक्रमांचे आभार मानले व लवकरच पुढील मोहिमा आखण्याचा आग्रह धरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *