

विरार : वसई-विरार महापालिकेत सफाई कामगार म्हणून भरती केले गेलेले तब्बल ४७० कामगार हे सफाई कामगार म्हणून काम करतच नव्हते; अशी माहिती देत आयुक्त गंगाथरन डी. यांनी पालिकेतील सर्वात मोठा घोटाळा उघड करत; कर्मचारी कपात का करावी लागली, याचा खुलासा गुरुवारी केला.
वसई-विरार महापालिका आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कोविड-१९ सोबतच विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.
वसई-विरार महापालिकेत ४७० कामगारांची नोंद कायमस्वरूपी सफाई कामगार म्हणून होती. मात्र यातील बहुतांश कामगार शिपाई, गार्डनिंग अशा विविध ठिकाणी कार्यरत होते. तर काही कामगार कामावर न येता घरी बसून पगार घेत होते, अशी धक्कादायक माहिती आयुक्त गंगाथरन डी. यांनी पत्रकारांसमोर उघड केली.
मात्र या कामगारांच्या बदल्यात ठेकेदारांनी सफाई ठेक्यात अन्य माणसे घेतली होती. या सर्वांवर वर्षाला २५ कोटी रुपये खर्च येत होता. आणि त्यामुळेच ही कामगार कपात करावी लागली, असा खुलासा करत आयुक्त गंगाथरन डी. यांनी पालिकेतील सर्वात मोठ्या कामगार घोटाळ्याला पूर्णविराम दिला.