नुकताच मे महिना संपला,जून उजाडला आणि थेंबे थेंबे पाऊस पडून पावसाळयाला सुरुवात झाली.संपलेला मे महिन्याचा शेवट हा माझ्या आयुष्यात बरच नवीन काही घेवून येणारा होता.एका आदिवासी कुटुंबात जन्माला आल्यामुळे धवलेरी हा शब्द लहानपणापासून ऐकिवात होता.समाजातील विविध कार्य त्यांच्याकडूनच पार पाडली जातात अशी माहिती माझ्यापर्यंत लहानपणी आली होती.जसजसा मोठा झाल्यावर काही आदिवासी चळवळी & संघटनांशी संबंध येवू लागला तसे आदिवासी समाजातील विविध परंपरा प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या.यातील एक म्हणजे धवलेरिंचे आदिवासी समाजातील लगीन समारंभात असलेलं अनमोल स्थान.

माझ्याच वाडा तालुक्यातील कोने या गावातील जयेश कदम नावाचा माझा अगदी जिवलग मित्र आहे.त्याच्याशी मैत्री झाल्यानंतर तालुक्यातील & जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांशी & कार्यकर्त्यांशी संपर्क झाला.यावर्षी मे महिन्याच्या ३०/३१ ह्या तारखेला जयेश च्या घरी ताईचे लग्न होते.गेली अनेक वर्ष चळवळीत सहभागी झाल्यामुळे आपली संस्कृती कोणती आणि इतरांनी आपल्यावर अप्रत्यक्षात लादलेली संस्कृती कोणती याची चांगली जाणीव जयेश ला असल्याने आपल्या बहिणीचे लग्न हे आदिवासी पद्धतीने करायचे हा निश्चय जयेश ने केला आणि लग्नाची तयारी सुरू केली.संचारबंदी लागू असल्याने अगदी शासन आणि प्रशासनाचे सगळे नियम पाळून कमीत कमी उपस्थितीत लग्न लावायचे होते,म्हणून अगदी साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता लग्न पार पाडायचा असे मनोमन ठरवले.महिला दिनाला पालघर येथे समाजातील धवलेरी महिलांचा सन्मान केलेला होता. म्हणून चळवळीतील मार्गदर्शक कीर्ती वरठा ताई यांना लग्न लावण्यासाठी धवलेरी महिलांना घेवून या असे सांगितले,आणि त्यांनीही होकार दिला.

आदिवासी संस्कृती परंपरेने लग्न होणार म्हणून आम्हा सर्व आदिवासी युवांना तसेच ग्रामस्थ आणि नातेवाईक यांना लग्नाची आतुरता लागली होती.पहिल्यांदाच अशा प्रकारचा लग्न सोहळा पाहायला मिळणार म्हणून मीही आनंदी होतो. ठरवलेल्या ३१ तारखेला सकाळी योग्य वेळेत मनोर येथील ३ आदिवासी धवलेरी महिलांना घेवून आमचे मार्गदर्शक, आदिवासी एकता परिषदेचे केंद्रीय कार्यालय संचालक तथा पालघर जिल्ह्याचे सचिव डॉ.सुनील पर्हाड सर आणि सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती वरठा ताई आणि युवा कार्यकर्ता जयेश मोरे या सगळ्यांनी लग्नात उपस्थिती लावली.विविध रिती उरकल्यानंतर लग्नाची वेळ झाली.लग्न मंडपात एकमेकांमध्ये अंतर ठेवून उभे राहिल्यावर सर्व शांत झाले आणि डॉ.सुनील सरांनी लग्नाला उपस्थित सरपंच,पोलीस पाटील आणि ज्येष्ठ नागरिक यांचे लग्नास परवानगी घेवून आपली आदिवासी संस्कृती परंपरा आपलं जपली पाहिजे,तसेच तिचे संवर्धन झाले पाहिजे म्हणून आपली लगीन परंपरा ही आपण टिकवून ती प्रत्यक्षात आचरणात आणायला हवी,असा संदेश दिला आणि त्यानंतर धवलेरी महिलांनी लग्न लावायला सुरुवात केली.

आतापर्यंत इतर संस्कृतीची मंगलाष्टके कानावर पडलेल्या व्यक्तींच्या कानावर आदिवासी धवलेरिंचे निसर्गाला सर्वस्व मानून त्याच्या विविध रूपांचे & गुणांचे आणि आदिवासी देवता वाघोबा,गावदेवी,हिरवा इ. यांना आळवणी करणारे शब्द कानावर पडल्यावर नक्कीच थोडंसं वेगळेपण जाणवले असणार.पण आपली मुळची हीच आदिवासी संस्कृती आहे याचीही जाणीव सर्वांना होती.योग्य वेळेत धवलेरी महिलांनी लग्न लावून त्यांनतर विविध रिती त्यांच्याकडूनच केले गेले. लग्नात कशा पध्दतीने गाणी बोलली जातात ती गाणीही यावेळी या महिलांकडून ऐकायला मिळाली.मौखिक परंपरा संवर्धनाचे इतके मोठे काम त्या करत असतात.बोलताना त्यांचे उच्चार अगदी स्पष्ट असून ते ती बोलीभाषा बोलणाऱ्या कुणालाही लगेच कळतील असे होते.

धवलेरी महिलेचे आदिवासी समाजात खुप मोठे स्थान आहे.पूर्वी आदिवासी समाजातील विविध कार्य त्यांच्याकडूनच करवून घेतली जात होती,तसेच आताही करतात.समाजातील विविध शुभ तसेच आनंदाच्या प्रसंगी त्यांचा खूप मोठा सहकार्याचा वाटा असतो.आदिवासी संस्कृती संवर्धनाचा वसा पुढे घेवून चाललेल्या या निरक्षर परंतु मौखिक परंपरेच्या ज्ञानाने परिपूर्ण असणाऱ्या आणि आतापर्यंत समाजातील विविध कार्य यशस्वी पार पाडणाऱ्या या धवलेरी महिलांचा मला प्रचंड अभिमान वाटतो.

या पद्धतीने पाहिलेले मी हे आमच्या तालुक्यातील पहिलेच लग्न आहे.खरंच मी बरेचशे युवा बघतो की ते फक्त आदिवासी दिनाला एकत्र होतात आणि इतर दिवस दुसऱ्यांची संस्कृती आपल्या डोक्यावर घेवून पूजत असतात.मी जयेश कदम या माझ्या मित्राला आणि पूर्ण कदम परिवार व कोने गावातील सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो की आपल्या संस्कृती परंपरेने आपण हे लग्न लावण्यास सहकार्य केले.अशाच पद्धतीने लग्न होण्याची आपल्याकडे नितांत गरज असून अशाने आपली संस्कृती तर वाचणार आहेच शिवाय आपण जे इतरांना लग्न लावण्यास बोलावून पैसे देतो,ते पैसे आपल्याच समाजातील धवलेरी महिलांना मिळतील,आणि थोड्या प्रमाणात का होईना, आदिवासींची सध्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *