
● हलगर्जीपणा दाखवणार्या रुग्णालयावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तर संचारबंदी डावळत अंत्यविधीसाठी जमलेल्या 6 ग्रामस्थांवर अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वसई : प्रतिनिधी : सध्याच्या आपत्ती काळात कोरोनासारख्या आपत्तीने भितीचे वातावरण निर्माण केले आहे. छोटीशी चूक देखील अनेक जणांना या कोरोना विषाणूने संक्रमित करू शकते. एका बाजूने आरोग्य यंत्रणा, प्रशासन सर्व खबरदार्या घेत असताना काही बेजबाबदार रुग्णालये कोरोना सारख्या आपत्ती काळात हलगर्जीपणा दाखवत सुटले आहेत. वसई पश्चिमेतील बंगली येथील कार्डिनल ग्रेशियस या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर इसमावर या रुग्णालयात यकृतावर उपचार सुरू होते. सदर रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा अहवाल येण्याआधीच रुग्णालयाने त्या रुग्णाचा मृत्तदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आश्चर्याची बाब अशी की त्या मृत रुग्णाचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. झाल्या प्रकारानंतर आणखी एक आश्चर्याची बाब समोर आली आहे, ती म्हणजे सदर कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या अंत्यविधीला त्यांच्या गावातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. अंत्यविधीसाठी संचारबंदीचे नियम झुगारून देत गर्दी करणार्या 6 ग्रामस्थांवर अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अहवाल येण्याआधीच मृत्तदेह ताब्यात देणार्या कार्डिनल ग्रेशियस रुग्णालय व्यवस्थापनावर आणि वैद्यकीय अधिकार्यावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झाल्या प्रकाराने कार्डिनल ग्रेशियस रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात तालुक्यात संतापाचे वातावरण असून ज्या नागरिकांनी सदर अंत्यविधीला उपस्थिती दर्शविली होती त्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम येथे राहणारे 58 वर्षीय प्रतिष्ठित गृहस्थ यकृताच्या आजारासाठी वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेसीस रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. मात्र रुग्णालयात उपचार घेत असताना या रुग्णाचा मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल हाती आले नसतानाही रुग्णालयाने त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला आणि नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी गर्दी केली. त्यांचे अंत्यसंस्कार उरकल्या नंतर त्यांच्या कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आणि सर्वांना एकच धक्का बसला. दरम्यानच्या काळात नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी 10 वाजता मृतदेहावर अंत्यसंस्कारदेखील आटोपले. यावेळी गावातील सुमारे शेकडो जनसमुदाय अंत्यविधीसाठी उपस्थित होता. कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयाने कोविड चाचणी अहवाल आला नसताना मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला कसा? असा प्रश्न उभा राहिला आहे. या विषयावर जेव्हा आक्रोश निर्माण झाला, तेव्हापासून हजारो लोकांची झोप उडाली आहे, संबंधित प्रशासन जागे होऊन आम्ही रुग्णालयाला नोटीस बजावत आहोत, त्याच प्रमाणे योग्य चौकशी घेऊन आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुढील कारवाई करु असे त्यांनी कालच जाहीर केले होते. सदर रूग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी केवळ सदर गावच नाही तर आसपासच्या अनेक गावातुन नातेवाईकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे वसई विरार पश्चिम भागातील हजारो नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. आज मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने सदर प्रकारची चौकशी करुन अखेर कार्डिनल ग्रेशिअस मेमोरियल हॉस्पिटल च्या व्यवस्थापकांवर वसई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कोरोना सारख्या काळात इतका बेजबाबदारपणा दाखवणार्या बंगली हॉस्पिटल सारख्या वसईतील नावाजलेल्या सर्वात मोठ्या हॉस्पिटल विरोधात सध्या नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. रुग्णालयाच्या एका चुकीमुळे अनेकांना या आजाराचा धोका आहे. दरम्यान या आजाराचा धोका वाढला तर त्याचे काय परिणाम होतील, याची कल्पनाही करवत नाही. या काळात रुग्णालयांनी आपली भूमिका व जबाबदारी ओळखून निदान वागावे असे आवाहन सुज्ञ नागरिकांनी केले आहे.
– या प्रकरणी कार्डिनल ग्रेशिअस मेमोरियल हॉस्पिटल व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा माझ्याकडे तपास घेतला असून चौकशी सुरू आहे. — अनंत पराड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे)
– अंत्ययात्रेस गर्दी केल्याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.
-महेश शेट्टी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,अर्नाळा पोलीस ठाणे)
रूग्णांना सापत्न वागणूक; तर महापालिकेची रूग्णालयाकडून दिशाभूल
रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी खाटा राखीव ठेवल्या असल्याची खोटी माहिती महापालिकेला सादर करून महापालिकेची दिशाभूल करण्याचे काम बंगली स्थित कार्डिनल गे्रशियस या रूग्णालयाने केले आहे. कोरोना काळात महापालिकेची आरोग्य यंत्रणा घोर मेहनत करून पालिकेचे डॉक्टर तसेच अन्य वैद्यकीय अधिकारी, यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असताना कार्डिनल ग्रेशियस सारखे रूग्णालय कोरोनासारख्या आपत्ती काळात रूग्णांच्या जीवाशी खेळ मांडून कोरोनाचा संसर्ग पसरवण्याचे काम करतेय, असा संताप तालुक्यातून व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान, तामतलाव, पापडी, वसई पश्चिम येथील एका रूग्णाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असतानादेखील दि. 2 जून 2020 रोजी त्यांना वसई पश्चिमेतील जी जी महाविद्यालयात असलेल्या रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच अन्य एका महिला रूग्णाला हॉस्पीटलमध्ये न घेण्याचा प्रताप या रूग्णालयाने केल्याचे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. सदर रूग्णालयाच्या या बेजबाबदारपणाबद्दल तालुक्यातून संतापाची लाट उसळली आहे