

वसई : (प्रतिनिधी) : वसई नागरी उपविभागातील वसई गाव, पाचूबंदर, हाथी मोहल्ला, नायगाव, मुळगाव, पारनाका, तामतलाव, उमेळमान, बरामपूर, गिरीज, कौलार, सांडोर इत्यादी सर्व परिसरासाठी 22/22 केव्ही पापडी उपकेंद्रामधून वीज पुरवठा करण्यात येतो. या पापडी उपकेंद्राला वसई पूर्वेकडील सबस्टेशन मधून फिडर क्र. 3 आणि फिडर क्र. 6 मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. वसई नागरी उपविभागाचा पूर्ण वीज पुरवठा या दोन्ही फिडरवर समान विभागण्यात आला आहे. परंतु आज वसई पूर्वेकडील जूचंद्र उपकेंद्राला वीज पुरवठा करणार्या फिडर क्र.14 चा डबल पोल स्ट्रक्चर वसई पूर्वेला खारटन भागात तुटून फिडर क्र.6 च्या डबल पोल स्ट्रक्चरवर पडला असल्यामुळे फिडर क्र.6 चा वीज पुरवठा बंद आहे. सदरचे काम घटनास्थळी साचलेल्या चिखलाच्या गाळामुळे आणि जवळ असलेल्या नाल्यामुळे आज करणे शक्य नाही, उद्या ते काम पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे वसई नागरी उपविभागाचा पूर्ण वीज पुरवठा केवळ फिडर क्र.3 वरून सुरू ठेवण्यात आला आहे. तरी याप्रसंगी नागरिकांनी घरातील विजेवर चालणारी शक्य तेवढी उपकरणे बंद ठेवून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी वीज मंडळाने केले आहे. यावेळी ए.सी.चा वापर करू नये जेणेकरून फिडर क्र.3 चा लोड वाढून वीज पुरवठा बंद होणार नाही. असे आवाहन महेश माधवी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वसई नागरी उपविभाग, महावितरण यांनी केले आहे.