टाळेबंदीच्या काळात दोन प्रवासी घेण्याचे आदेश; रिक्षाचालकांत नाराजी !

वसई : (प्रतिनिधी) : दिनांक 25 मार्चपासून सुरू झालेली टाळेबंदी पाचव्या टाळेबंबीपर्यंत आली. या काळात रोजंदारीवर काम करणार्‍या सामान्य नागरिकांबरोबरच वसईतील हजारो रिक्षाचालकांवर व्यवसाय ठप्प असल्यामुळे उपासमारीची वेळ ओढवली आहे. सध्या शासनाच्या आदेशानंतर जनजीवन हळुहळू पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. रिक्षाचालकांनादेखील व्यवसायासाठी परवानगी देण्यात आली असली तरी रिक्षाचालकांना केवळ दोन प्रवासी रिक्षात घेऊन व्यवसाय करता येणार असल्याने रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मागील दोन महिन्यांपासून अधिक काळ टाळेबंदी असल्याने रिक्षाचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. या रिक्षाचालकांना वार्षिक 9 हजार रूपये इन्शूरन्सकामी भरणा करावे लागतात. मात्र दोन महिने घरीच असल्याने रिक्षाचालकांसमोर जगण्याचे मोठे आव्हान आहे. अशा काळात इन्शूरन्स कंपन्यांनी इन्शूरन्सचा काळावधी वाढवून रिक्षाचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जुचंद्र येथील रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केली आहे. वसई तालुक्यातील रिक्षाचालकांची संख्या मोठी आहे. यात स्थानिक भूमीपूत्रांची संख्यादेखील मोठी आहे. लॉकडाऊनआधी कमावून ठेवलेले पैसे आता संपत आल्याने त्यांच्यासमोर घरखर्च चालवण्यासाठी अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. रिक्षा व्यवसाय ठप्प असल्याने हा घरखर्च चालवायचा कसा? असा सवाल त्यांच्यासमोर उभा राहीला आहे. सध्या शासनाने दिलेल्या निर्णयानंतर हळुहळू जनजीवन पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाली असली तरी लोकल बंद असल्याने आणि केवळ दोन प्रवाशांना घेऊन प्रवास करण्याची मुभा असल्याने रिक्षाचालकांना ते परवडेनासे होईल. शासनाने आधीच रिक्षाचालकांसमोरील प्रश्‍न विचारात न घेता त्यांना कोणत्याही स्वरूपाची मदत केलेली नाही. त्यात केवळ दोन प्रवासी घेऊन प्रवास करणे अन्यायकार असल्याचे मत मांडत रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच शासनाने आधीच अडचणित असलेल्या रिक्षाचालकांना मदत करण्याची मागणी एकनाथ पाटील यांनी शासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *