

◆ वसईतील 5 रूग्णालयांकडून रूग्णांची भरमसाठ लुट? महापालिकेने निश्चित केलेल्या दरातच शुल्क आकारणी करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा; महापालिकेचा इशारा
वसई : (प्रतिनिधी) : कोव्हीड-19 सारख्या आपत्तीने देशात मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला आहे. वसई विरार शहर महानगरपालिका परिसरातदेखील कोरोना रूग्णांनी हजारी ओलांडली आहे. या काळात कोरोना विषाणूने संक्रमित होणार्या रूग्णांसाठी शासनाकडून आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. मात्र वसईतील 5 रूग्णालयांकडून कोरोना रूग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारणी केली जात असल्याचे समोर आले आहे. या भरमसाठ वसुली करणार्या रूग्णलयांना वसई विरार शहर महानगरपालिकेने रितसर नोटीसा बजावून यापुढे कोरोना रूग्णांकडून जादा शुल्क आकारणी न करता कोव्हीड-19 आपात्कालीन परिस्थितीत आरोग्ष सेवा प्रदात्यांकडून आकारल्या जाणार्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दि. 21 मे 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनेच्या परिशिष्ट-सी नुसार दर आकारण्यात यावे, असा आदेश दिला आहे. तसेच सदरचे परिशिष्ट -सी रूग्णालयाच्या दर्शनिय भागात लावण्यात यावे, असे आदेशदेखील देण्यात आले आहेत. महापालिकेने निश्चित करून दिलेल्या दरापेक्षा जादा दर रूग्णांकडून आकारल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
महाराष्ट्र सचिव, महाराष्ट्र शासन यांच्याकडील कोरोना-2020/प्र.क्र.97/आरोग्य, सार्वजनिक आरोग्य विभाग यानुसार कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यात कोव्हीड-19 रूग्णांच्या उपचाराकरिता मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या असून सदर मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट (सुधारणा) 2006 अंतर्गत नोंदणीकृत आरोग्य सेवा देणार्यांकडून कोव्हीड-19 आपातक्लीन परिस्थितीत जादा रक्कम आकारली जात असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो. अशा तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुषंगाने महापालिकेने वसईतील पाच रूग्णालयांना सदर नोटीस पाठवून कोव्हीड-19 रूग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारणी न करता महापालिकेने ठरवून दिल्यानुसारच शुल्क आकारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वसईतील रिद्धी विनायक मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल, नालासोपारा पश्चिम, स्टार हॉस्पीटल, नालासोपारा पश्चिम, विनायका हॉस्पीटल, नालासोपारा पूर्व, गोल्डन पार्क हॉस्पीटल, वसई पश्चिम, विजय वल्लभ हॉस्पीटल, विरार पश्चिम या रूग्णालयांना महापालिकेने सदरची नोटीस पाठवली आहे. वसईतील कार्डीनल ग्रेसीस रूग्णालयाच्या प्रतापानंतर महापालिकेन भरमसाठ शुल्क आकारणी करणार्या रूग्णापयांना दणका देण्याचे काम सुरू केल्याने रूग्णांना दिलासा मिळाला आहे.