

कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध यंत्रणा आपले सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. चंद्रपाडा, वाकीपाडा तथा नायगाव पुर्व परिसरात कोरोनाचा शिरकाव झालेला असून दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थ तथा नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासनामार्फत चंद्रपाडा नाका, चंडिका मंदिर पायथ्याजवळील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयसोलशन कक्ष तयार करण्यात आलेला असून सद्यस्थितीत १४ संशयितांना (क्वारंन्टाईन पेशंट) त्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. चंद्रपाडा आयसोलेशन कक्ष हा मुख्य नाक्यावरच असून आसपास मोठी लोकवस्ती तथा दुकाने आहेत. बापाणे हायवे रस्ता, नाका परिसर, गावात जाण्याचे मार्ग व नुकताच लॉकडाऊन शिथिल झाल्याने या ठिकाणी वाहनांची तथा नागरीकांची वर्दळ जास्त असते. शेती, नोकरी धंद्यानिमित्त नागरिक बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे चंद्रपाडा परिसरात कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका जास्त असल्याने चंद्रपाडा वासियांमध्ये तथा आसपासच्या गावातील नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे.
वरील गंभीर परिस्थिती व नागरिकांची गैरसोय पाहता बहुजन विकास आघाडी, वाकीपाडा अध्यक्ष आविष्कार पाटील यांनी मा. पालघर जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देवून जिल्हा परिषद शाळा चंद्रपाडा येथील आयसोलेशन कक्ष स्थलांतरीत करण्याची विनंतीवजा मागणी केलेली आहे.