


◆ पत्रकारांबाबत भूमिका न बदलल्यास काळ्या फिती लावून धरणे आंदोलनाचा इशारा ?
वसई, दि. 11(सुधीर भोईर) : वसई-विरार शहर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डी.गंगाथरन रुजु झाल्यापासून पत्रकारांना महापालिकेतून काही माहिती मिळविणे किंवा महत्वाच्या प्रश्नांवर त्यांची प्रतिक्रिया मिळवणे अवघड झाले असून, आयुक्त सामान्य पत्रकारांशी तुच्छतेने वागत असल्याचा आरोप वसई-विरार महानगर पत्रकार संघानेे केला आहे.पत्रकारांना सातत्याने सहकार्य नाकारून, स्वतः बोलविलेल्या पत्रकार परिषदेस बहुसंख्य पत्रकारांना निमंत्रित न करता, त्यांचा अपमान केल्याबद्दल आयुक्तांच्या मनमानी कार्यपद्धतीचा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी निषेध नोंदवला आहे. तसेच निषेधाचे हे निवेदन आयुक्तांसहीत मुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास मंत्री,
खासदार व आमदारांना सादर केले आहे. आयुक्तांनी पदभार स्विकारल्यापासून पत्रकारांना त्यांच्याकडून मिळत असलेली वागणूक दुय्यम स्वरूपाची असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. पत्रकारांचे फोन न उचलणे, तसेच स्थानिक पत्रकारांना सापत्न वागणूक देणे असे प्रकार दोन अडीच महिन्यांच्या काळात सतत घडत असल्याने महापालिका व पत्रकार यांच्यात मागील अनेक वर्षांपासून असलेले जिव्हाळ्याचे नाते संपुष्टात आले आहे. नजिकच्या काळात आयुक्तांनी त्यांचे वर्तन न सुधारल्यास पत्रकारांना काळ्या फिती बांधून पालिका मुख्यालयासमोर निषेध आंदोलन करावे लागेल, असा इशारा अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी या पत्रात दिला आहे.
वसई-विरार महानगर पत्रकार संघाने या निवेेेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायती ते नगरपरिषदा, नगरपरिषदा ते महापालिका असे या महानगराचे बदलते स्वरूप वसईतील अनेक पत्रकारांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. आजही वसईतील असे अनेक पत्रकार आहेत जे मागील ३० ते ३५ वर्षांपासून वसई तालुक्यात पत्रकारिता करीत आहेत. वसई-विरार महापालिका आणि या पत्रकारांचे करदाते म्हणून तसेच लोकांचे प्रश्न, समस्या मांडणारे जनप्रतिनिधी म्हणूनही दुहेरी संबंध आहेत.या महानगराच्या विकासात त्यांचाही वाटा आहे. म्हणूनच येथे महापालिका आणि पत्रकार यांच्यात वर्षानुवर्ष जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मात्र गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून ते खंडित झाले आहेत. यापूर्वी महानगरपालिकेच्या विविध योजना, प्रासंगिक उपक्रम आणि अन्य जाहीर आवाहनांबाबत रितसर प्रसिद्धीपत्रक आम्हाला सोयीच्या फॉर्मेटमध्ये पालिकेकडून मेलद्वारे पाठवले जायचे. विशिष्ट योजनांची माहिती देण्यासाठी अनेकदा महापालिका पत्रकार परिषद आयोजित करीत आली असून त्यासाठी सर्व पत्रकारांना ई-मेलवर अधिकृत निमंत्रण देत आली आहे.
मात्र आयुक्त डी.गंगाथरन यांच्या आगमनानंतर पालिका व पत्रकार यांच्यातील समन्वय आणि सलोखा संपुष्टात आला आहे. पत्रकारांना तुच्छ वागणूक देणे, शहर विकास अथवा जनतेच्या प्रश्नांवर लेखन करताना महापालिकेची बाजू आणि भुमिका विचारण्यासाठी आयुक्तांना कॉल, मॅसेजेस पाठवल्यानंतर त्यावर साधा प्रतिसाद दिला जात नाही. सध्याची परिस्थिती ही कोणाला प्रत्यक्ष भेटण्याची नाही, अशावेळी फोन द्वारा संपर्क साधूनच बर्याचशा गोष्टींची माहिती पत्रकारांना घ्यावी लागते. परंतु आयुक्तच पत्रकारांशी तुच्छतेने वागत असल्याचे पाहून महापालिकेचे इतर अधिकारीदेखील त्याच पद्धतीने वागू लागले आहेत, असे पत्रकार संघाच्या निवेदनात नमूद केले आहे.
दि. ४ जून २०२० रोजी आयुक्तांनी मोजक्याच पत्रकारांना आयत्यावेळी फोन करून महापालिकेत जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण आयुक्तांनी स्थानिक व मुंबई वृृत्तपत्रांत लिखाण करणाऱ्या वसईतील बहुसंख्य पत्रकारांना दिले नव्हते.म्हणून या पत्रकारांना डावलण्यात येऊन, अपमान करण्यात आल्याने पत्रकारांमध्ये नाराजीची भावना आहे. आयुक्तांच्या या कार्यपद्धतीचा वसई-विरार महानगर पत्रकार संघाने निषेध केला असून आयुक्तांनी आपले वर्तन सुधारले नाही तर वसईतील सर्वच पत्रकार त्यांच्याविरोधात महापालिका मुख्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करतील, असा इशारा या निवेदनात दिला आहे.