
विरार (संजय राणे): वसई-विरार महापालिकेच्या बेफिकिरीमुळे विरार-नारिंगी येथील ७८ वर्षीय कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही हेळसांड झाल्याची माहिती समोर आली आहे. तर रुग्णाला मदत करणाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने या सगळ्यांचे कुटुंबीयही धोक्यात आले आहेत.
विरार-नारिंगी येथील प्रभाकर इंगळे (७८) यांना ३१ मे रोजी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने विरार येथील संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र संजीवनी रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना विरार येथील विजयवल्लभ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तिथेही त्यांना दाखल करून घेण्यात न आल्याने त्यांना नालासोपारा येथील रिद्धिविनायक रुग्णालयात नेण्यात आले; मात्र या रुग्णालयाने बेड उपलब्ध नसल्याने दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवली व इंगळे यांची कोरोना चाचणी करून घेण्यास सुचवले.
त्याच दिवशी इंगळे यांना नालासोपारा येथील पालिका रुग्णालयात आणण्यात आले, अशी माहिती प्रभाकर इंगळे यांच्यासोबत असलेल्या सुदीप कांबळे यांनी दिली.
या रुग्णालयातून त्यांना शताब्दी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला; मात्र या ठिकाणी नेण्यात आल्यानंतरही बेड उपलब्ध झाला नाही तर? अशी शंका सुदीप कांबळे यांना आल्याने त्यांनी हा निर्णय प्रभाकर इंगळे यांचा मुलगा सुबोध यांच्यावर सोडला. त्यानुसार इंगळे यांना विरार-साईनाथ नगर येथील डॉ. गावीत यांच्याकड़े आणण्यात आले.
अखेर गावीत यांच्या सल्ल्याने १ जून रोजी वसईतील अगरवाल रुग्णालयात इंगळे यांचे घशाचे नमुने घेण्यात आले, अशी माहिती कांबळे यांनी दिली. ३ जून रोजी इंगळे यांची कोरोना चाचणी पॉझिटीव आल्याने त्यांना पालिकेकडून रिद्धिविनायक रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आले.
त्यासाठी पालिकेकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आली; मात्र चालकाव्यतिरिक्त या रुग्णवाहिकेसोबत पालिकेचा कुणीही कर्मचारी नव्हता. परिणामी सुदीप कांबळे, महेश वाघेला, विवेक गायकर आणि विकास कदम यांनी कोरोना पॉझिटीव असलेल्या प्रभाकर इंगळे यांना रुग्णवाहिकेत ठेवावे लागले, असे सुदीप कांबळे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान; रिद्धिविनायक रुग्णालयात रुग्णवाहिका पोचून तब्बल तीन तास झाले तरी प्रभाकर इंगळे यांना दाखल करून घेण्यास अथवा त्यांची तपासणी करण्यास डॉक्टर आले नाहीत; अशी तक्रार इंगळे यांचा मुलगा सुबोध इंगळे यांनी सुदीप कांबळे यांच्याकड़े करत रिद्धिविनायक हॉस्पिटलच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती.
या वेळेच्या अपव्ययात प्रभाकर इंगळे यांचा मृत्यू झाला. इंगळे यांचा मृत्यू होऊन चार तास लोटले तरी पालिकेचा एकही कर्मचारी तिथे आला नव्हता, अशी तक्रारही सुबोध इंगळे यांनी; सुदीप कांबळे यांच्याकड़े केली होती. अखेर दुसऱ्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते अमर कोंडकर यांच्या ओळखीतूनच प्रभाकर इंगळे यांचे शव दहन करण्यात आले, अशी माहिती सुदीप कांबळे यांनी दिली.
दरम्यान; आता प्रभाकर इंगळे यांचा मुलगा सुबोध इंगळे (४५), त्यांची पत्नी आणि मुलगी, प्रभाकर इंगळे यांना स्ट्रेचरवरून अम्ब्युलन्समध्ये ठेवणारे महेश वाघेला (३३), विकास कदम (४०), सुबोध इंगळे यांना रिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या रिक्षाचालक कुणाल सूर्यवंशी यांच्या कोरोना टेस्ट पॉझिटीव आल्या आहेत. यात एकमेव प्रभाकर इंगळे यांच्यासोबत सतत चार दिवस सर्व रुग्णालयांत फिरलेल्या सुदीप कांबळे (२८) यांची टेस्ट मात्र निगेटीव आली आहे.
विशेष म्हणजे महापालिकेकडून या सगळ्यांना कुटुंबासह विलगीकरण कक्षात दाखल होण्यास सांगण्यात आले असले तरी; या ठिकाणी प्रति व्यक्ती २५० रुपये खर्च करावे लागणार असल्याने या सगळ्यांनी धसका घेतला आहे. या प्रत्येकाच्या घरांत प्रत्येकी पाच व्यक्ती असल्याने १४ दिवसांकरता या सगळ्यांना ८ ते १० हजार रुपयांचा भुर्दण्ड सोसावा लागणार आहे.
या धकाधकीत सुबोध इंगळे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते; मात्र या हॉस्पिटलमध्ये काळजी घेण्यात येत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. तर त्यांची पत्नी आणि मुलगी वसईतील जीजी कॉलेजमधील विलगीकरण कक्षात दाखल आहेत, अशी माहिती सुदीप कांबळे यांनी दिली.
वसईतील रुग्णालये कोविड-१९च्या रुग्णाना तुच्छतेने वागवताना दिसत आहेत. अशा वागणुकीमुळे आज एका व्यक्तीचा नाहक़ जीव गेला आहे. अशा संकटात रुग्णालयांनी माणुसकी दाखवणे अपेक्षित होते; त्यांच्याकडून चांगल्या उपचाराची अपेक्षा होती. पण ही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप देत आहेत. रुग्णालयांच्या या माणुसकीहीनतेबाबत आम्ही आयुक्तांना पत्र दिले आहे
– नरेंद्र पाटील; नगरसेवक, प्रभाग-१०
प्रभाकर इंगळे यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका आली तेव्हा पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांच्यासोबत का नव्हते? विकास कदम आणि महेश वाघेला यांनी स्ट्रेचरवरुन रुग्णवाहिकेत इंगळे यांना उचलून ठेवल्याची त्यांना इतकी मोठी किंमत मोजावी लागली आहे. या दोघांच्या कुटुंबियांची जबाबदारी आता कुणी घ्यायची? अशी कामे स्थानिक नागरिकांना करावी लागणार असतील तर महापालिकेचा आरोग्य विभाग काय करतो? महापालिकेचे कोणतेही नियोजन का नाही?
– महेश कदम, शहर सचिव, मनसे