
विरार : सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या अपंग कल्याणकारी संस्थेने, संस्थेला नेहमी सहकार्य करणारे संस्थेचे हितचिंतक बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नुकताच गरजू महिलांसाठी स्वच्छता विषयक माहिती देणारे शिबीराचे आयोजन केले. केंद्र सरकारच्या स्त्री स्वाभिमान योजनेअंतर्गत लोकसेवा केंद्र अर्नाळा या CSC सेंटरमार्फत तयार करण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिनचे संस्थेतर्फे उपस्थित महिलांना मोफत वाटप करण्यात आले.
अर्नाळा फॅक्टरी पाडा येथे या उपक्रमात छोट्या प्रमाणात सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन सुरू करण्यात आल्याचे अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष आणि लोकसेवा केंद्राचे प्रमुख शमीम खान यांनी सांगितले. सॅनिटरी नॅपकिन हा महिलांसाठी महत्वाचा विषय आहे. मात्र आजही गाव खेड्यात या उत्पादनाबाबत महिलांमध्ये फारशी जनजागृती नाही. बाजारात उपलब्ध असलेले सनेटरी नॅपकिन्स महागडे असून सामान्य महिलांना परवडणारे नाही. तसेच त्यात रबराचा वापर होत असल्याने शरीराला त्रासदायक असल्याचे दिसून आले आहे. त्याऐवजी स्त्री स्वाभिमान उपक्रमात अर्नाळ्यात दर्जेदार नॅपकिन्स तयार केली आहेत. हे नॅपकिन्स पर्यावरणदृष्ट्या पूरक आणि सहजरित्या विघटन होणारे , पूर्णपणे केमिकल आणि प्लॅस्टिकमुक्त स्वदेशी सनेटरी नॅपकिन्स आहेत. या नॅपकिन्समध्ये जास्तीत जास्त रक्तस्त्राव शोषून धरण्याची क्षमता असून ते हाय ऑक्सिजनयुक्त आहेत. या प्रकल्पात चौघांना रोजगार उपलब्ध झाला असून भविष्यात हा प्रकल्प विस्तारून पालघर जिल्ह्यात दुर्गम भागातील महिलांपर्यंत हे नॅपकिन्स पोहचवण्याचे उद्दिष्ट खान यांनी यावेळी व्यक्त केले. शाळा सुरू झाल्यावर शालेय विद्यार्थिनींना जवळपास चार हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्याचे नियोजन असल्याचे खान यांनी सांगितले.
अर्नाळा शेजारील धोबीतलाव येथील जवळपास 50 महिला आणि मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सची पाकिटे वाटप करण्यात आली. धोबीतलाव येथील समाज मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. महिलांना यावेळी स्वछतेविषयक आणि महिलांना सरकारच्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमाला दीपा माळी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कोळी, राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेचे अध्यक्ष शरद तिगोटे, रतीलाल बेनबन्सी आदिवासी एकता परिषदेचे रवींद्र पालकर आदी उपस्थित होते.